सदावर्तेंची केबीनमध्ये एक तास चाैकशी, पोलिसांनी आवाजाचे नमुनेही घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:34 IST2022-04-18T11:27:33+5:302022-04-18T12:34:25+5:30

खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे

With an hour-long chase in Gunratna Sadavarten's cabin, police also took sound samples | सदावर्तेंची केबीनमध्ये एक तास चाैकशी, पोलिसांनी आवाजाचे नमुनेही घेतले

सदावर्तेंची केबीनमध्ये एक तास चाैकशी, पोलिसांनी आवाजाचे नमुनेही घेतले

सातारा : आक्षपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारापोलिसांच्या कोठडीत असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची रविवारी पोलीस ठाण्यात एक तास कसून चाैकशी करण्यात आली. त्यानंतर जाबजबाब झाल्यानंतर त्यांना पुन्हा कोठडीत नेण्यात आले. दरम्यान, बारामती येथे सदावर्तेंना काळे फासणाऱ्यांना बक्षीस जाहीर केल्याने सातारा पोलिसांनी सदावर्तेंच्या कोठडीसमोरील बंदोबस्तात आणखी वाढ केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सदावर्ते यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने पुणे येथे फाॅरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी ॲड. सदावर्ते यांना पुन्हा कोठडीतून बाहेर काढण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्यातील केबीनमध्ये त्यांची तासभर चाैकशी करण्यात आली. या चाैकशीतील जाबजबाब झाल्यानंतर पुन्हा त्यांना कोठडीत नेण्यात आले.

बारामती येथे एका संघटनेने सदावर्ते यांना काळे फासणाऱ्यांना ५१ हजारांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे इकडे सातारा पोलिसांनी सदावर्तेंच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख बजावली असून, पोलीस कोठडीबाहेर बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, सोमवारी सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळीही पोलिसांचा अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.

कोल्हापूर पोलिसांचा सदावर्तेंचा ताबा मिळण्यासाठी अर्ज

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कोल्हापूर पोलिसांनी मुंबई येथील गोरेगाव न्यायालयात सदावर्तेंचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. सातारा न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सदावर्तेंना अर्थररोड कारागृहात नेले जाणार आहे. त्यानंतर तेथून कोल्हापूरच्या पोलिसांकडे त्यांचा ताबा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Web Title: With an hour-long chase in Gunratna Sadavarten's cabin, police also took sound samples