'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:36 IST2025-11-04T18:35:45+5:302025-11-04T18:36:56+5:30
काल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी जाहीर कार्यक्रमात निंबाळकर यांची दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला. यावरुन आता रामराजे निंबाळकर यांनी निशाणा साधला.

'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरुन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप झाले. यानंतर काल फलटण येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभ घेतली. या सभेत त्यांनी काही पुरावे दाखवत यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावेळी महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला. दरम्यान, यावरुन आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
आज रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. 'उद्यापासून आचारसंहिता लागेल. काही गोष्टी बोलता येणार नाहीत. त्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. मागची ३० वर्ष आम्ही काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे, असे मी याआधीही बोललो आहे. त्यांनी आरोप केला की, हे रामराजे यांनी केले. त्यांनी माझे टोपण नाव मास्टर माईंड ठेवले. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, ती रद्द व्हावी, असे सांगितले. या संदर्भात माझा काहीही संबंध नाही', रामराजे नाईक निंबाळकर यांनी असे स्पष्ट केले.
"ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या झाली त्याचा मास्टरमाईंड मीच आहे का? पोलिसांना जे सांगितले त्याचा ही मास्टरमाईंड मीच आहे का? त्यांनी माझ्यावर अब्रू नुकसान दावा लावावा. मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करावा",अशी मागणी रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
दुधाचा अभिषेक देवाला घालतात
गोरे प्रकरणात माझे फोन झाले म्हणून माझी पोलिसांनी चार तास चौकशी झाली होती. २०२२ साली मला गुंतवण्याचा प्रयत्न केला मी कधी तक्रार केली का? २०१९ ला अजित पवार यांच्यावर पाणी चोरल्याचा आरोप केला. त्यांचा आमदार कशावर उभा राहिला? ननावरे केस झाली त्याला मी सांगितले का त्याचा मास्टरमाईंड मीच आहे का? दुधाचा अभिषेक केला हा इव्हेंट नाहीतर काय आहे. अभिषेक कोणाला घालतात देवाला, हा काय देव आहे का?, असा निशाणा निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर साधला.