vidhan sabha assembly election result 2024: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत, साताऱ्यात महायुतीचा झेंडा
By दीपक शिंदे | Updated: November 23, 2024 14:36 IST2024-11-23T14:34:56+5:302024-11-23T14:36:20+5:30
दीपक शिंदे सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा ...

vidhan sabha assembly election result 2024: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत, साताऱ्यात महायुतीचा झेंडा
दीपक शिंदे
सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा गड ढासळला असून महायुतीचाच बालेकिल्ला तयार झाला आहे. भाजपच्या चार, शिंदेसेनेच्या दोन आणि अजित पवार गटाने दोन जागांवर विजय मिळवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील विजयापर्यंत पोहोचू दिले नाही.
सातारा विधानसभेच्या आठ जागांपैकी साताऱ्याच्या जागेवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपेक्षित विजय मिळविला. त्यांना किती लीड मिळणार एवढीच उत्सुकता होती. त्यांनी १ लाख ७५ हजार ६२ मते मिळवत उद्धवसेनेच्या अमित कदम यांचा १ लाख ४० हजार मतांनी पराभव केला.
वाई विधानसभा मतदारसंघातही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटील यांनी ५० हजारांहून अधिकचे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव केला.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांचा शिंदेसेनेच्या महेश शिंदे यांनी अटीतटीच्या लढाईत पराभव केला.
फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना शह देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले उमेदवार सचिन पाटील यांना निवडून आणले. माजी आमदार दीपक चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याबरोबरच रामराजेंचा मतदारसंघावरील प्रभाव कमी करण्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही यश आले.
पाटणमध्ये शंभुराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात चांगली लढत झाली. उद्धवसेनेचे हर्षद कदम किती मते घेतात त्यावर या ठिकाणचा निकाल अवलंबून होता. मात्र, त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे शंभुराज देसाई यांचा विजय सोपा झाला.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब पाटील यांना शह देत भाजपच्या मनोज घोरपडे यांनी विजयश्री खेचून आणला. त्यांना शेवटच्या टप्प्यात शह देण्याचा प्रयत्न झाला मात्र पहिल्यापासून मतदारसंघात सुरू केलेला झंझावात रोखण्यात विरोधकांना यश आले नाही.
माण मतदारसंघातून भाजपच्या जयकुमार गोरे यांनी पहिल्यापासून आघाडी घेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकर घार्गे यांचा पराभव केला. घार्गे यांच्या बाजूने आमचं ठरलंयचे सर्व नेते येऊन देखील त्यांना आपल्यात एकी ठेवता आली नाही. तर जयकुमार गोरे यांच्या मदतीला बंधू शेखर गोरे आणि दिलीप येळगावकर आल्यामुळे त्यांना आपला विजयश्री सोपा करता आला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणी भाजपचे अतुल भोसले यांनी विजय मिळविला आहे. पहिल्या फेरीपासूनच अतुल भोसले आघाडीवर होती. मतमोजणीच्या फेऱ्या वाढल्या तसे त्यांचे मताधिक्यही वाढत गेले. सुमारे ४० हजारांहून अधिक मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.