silver oak attack: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'फलटण बंद' ठेवून निषेध, आंदोलकांवर कडक कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 18:26 IST2022-04-09T18:25:34+5:302022-04-09T18:26:18+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढून फलटण बंदचे आवाहन केले. अचानक बंद झाल्यामुळे अनेक दुकानदारांची व भाजीविक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.

silver oak attack: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'फलटण बंद' ठेवून निषेध, आंदोलकांवर कडक कारवाईची मागणी
फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचे फलटण तालुक्यातही पडसाद उमटले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फलटण बंद ठेवण्यात आला.
मुंबई येथील सिल्व्हर ओक या खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी काल, शुक्रवारी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून चपला आणि दगडफेक केली होती. तसेच विरोधी घोषणा दिल्या होत्या. या घटनेचे पडसाद आज, शनिवारी फलटण तालुक्यात उमटले. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन फलटण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत चुकीच्या गोष्टींना सरकारने पायबंद घालावा व अशा गोष्टी पुन्हा होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. तर, या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करत याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करून आंदोलकांवर कडक कारवाईची मागणी केली.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढून फलटण बंदचे आवाहन केले. अचानक बंद झाल्यामुळे अनेक दुकानदारांची व भाजीविक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.