उद्धवसेनेकडून पाटणमधून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर; महाआघाडीत बंडखोरीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:56 IST2024-10-24T13:56:04+5:302024-10-24T13:56:38+5:30
सातारा : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नसतानाच उद्धवसेनेने पहिली यादी जाहीर करत पाटणमधून हर्षद कदम यांच्या ...

उद्धवसेनेकडून पाटणमधून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर; महाआघाडीत बंडखोरीची शक्यता
सातारा : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नसतानाच उद्धवसेनेने पहिली यादी जाहीर करत पाटणमधून हर्षद कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पाटणमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादी अर्थात पाटणकर गट निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आठ दिवस झाले आहेत. तरीही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. दररोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला गेले आहेत हे पूर्णपणे स्पष्ट नाही. वरिष्ठ स्तरावर जागा वाटपावरून चर्चा सुरूच आहे. अशातच उद्धवसेनेने बुधवारी सायंकाळी आपली पहिली ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघासाठी हर्षद कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
पण, मुळातच पूर्वीच्या आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत आलेला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अर्थात पाटणकर गटाची ताकद मोठी आहे. त्यातच येथे पक्षापेक्षा गटातच निवडणूक होते. अशातच उद्धवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने पाटणकर गट शांत बसेल, अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे आघाडीत बंडखोरी होऊ शकते. तसेच सत्यजितसिंह पाटणकर हे अपक्ष लढू शकतात. त्यामुळे पाटणमध्ये तिरंगी लढत होण्याची अधिक शक्यता आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीचीही यादी येणार..
आघाडीत उद्धवसेनेने पहिल्यांदा यादी जाहीर केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यादी जाहीर होईल. पण, सातारा जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत. त्यातील कोणाच्या वाट्याला किती गेलेत हेच स्पष्ट नाही. त्यातच उद्धवसेना दोन मतदारसंघासाठी आग्रही आहे. काँग्रेसलाही दोन मतदारसंघ हवेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला फक्त चार मतदारसंघच राहतात. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतरच कोणाकडे किती मतदारसंघ राहणार, हे स्पष्ट होणार आहे.