Satara: दुष्काळी भागासाठी वरदान वाटणारा पाऊस संकट होऊन कोसळला; शेती, नागरी वस्त्यांमध्ये मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:24 IST2025-09-30T18:23:52+5:302025-09-30T18:24:45+5:30
कोयना, वीर धरणांचे विसर्ग कायम, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Satara: दुष्काळी भागासाठी वरदान वाटणारा पाऊस संकट होऊन कोसळला; शेती, नागरी वस्त्यांमध्ये मोठे नुकसान
सातारा : माण-खटाव दुष्काळी भागासाठी वरदान वाटणारा पाऊस शनिवारी संकट होऊन कोसळला. जिल्ह्यासह अतिवृष्टी झाली तरी माण-खटावमध्ये पावसामुळे शेती आणि नागरी वस्त्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, कोयना धरणांतून ११,२३१ क्युसेक विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्याने दि. २९ रोजी सकाळी सव्वा आठ वाजता सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून एक फुटावर खाली आणून ९,१३१ क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातील २१०० क्युसेक असे एकूण ११,२३१ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच वीर धरणातूनही विसर्ग वाढवला असून शनिवारी दुपारी दोन वाजता नीरा नदीपात्रात ७८३७ क्युसेक पाणी सोडण्यात येणार आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा निरा उजवा कालवा विभागाने दिला आहे.
पालकमंत्र्यांकडून माण तालुक्याची पाहणी
पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी अतिवृष्टीमुळे बाधित गोंदवले बु, लोधवडे, पिंपरी व म्हसवड शहरातील झालेल्या नुकसानीची पहाणी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी उज्वला गाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. म्हसवड शहरातील दुकानांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. तसेच शेती, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे तातडीने करावे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करावा. अतिवृष्टी बाधितांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापनासाठी चॅटबॉट
आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘व्हाॅट्सॲप चॅट बॉट’ ही सुविधा सुरू केली आहे. याच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात दहा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये पर्जन्यमानबाबत माहिती, धरण पातळी, नदी, पूल पाणी पातळी, रस्त्यांबाबत स्थिती, हवामान अंदाज, महत्त्वाची माहिती अथवा संदेश, नकाशे, आपत्ती दरम्यान काय करावे व काय करू नये, आपत्कालीन संपर्क व हेल्पलाईन, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा इत्यादींची माहिती नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभसेवा मिळाव्यात यासाठी 'व्हाट्सॲप चॅट बॉट' ही सुविधा विकसित केली आहे. नागरिकांनी 9309461982 या क्रमांकावर संदेश पाठवल्यानंतर आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.