डीजे मालकाला नोटीस; आवाजाचे पुन्हा उल्लंघन केल्यास होणार दहा लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:37 IST2025-09-04T13:36:48+5:302025-09-04T13:37:15+5:30
डीजे वाजवताना आता विचार करावा लागेल

संग्रहित छाया
सातारा : साताऱ्यात गणेशोत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी डीजे मुक्तीचा नारा दिल्यानंतर न्यायालयानेही डीजेविरोधात कडक धोरण अवलंबले आहे. साताऱ्यातील एका डीजेमालकाला ‘आवाजासंदर्भातील नियमांचे पुन्हा उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास १० लाखांचा दंड केला जाईल,’ अशी नोटीस न्यायालयाने बजावली आहे. त्यामुळे इतर डीजेमालकांचे या नोटिसीमुळे धाबे दणाणले आहेत.
साताऱ्यात पहिल्यांदाच डीजेमुक्तीसाठी ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकाऱ्यांपासून पोलिस अधीक्षकांपर्यंत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना ज्येष्ठांनी निवेदन देऊन डीजेमुक्तीचा नारा दिला. ‘लोकमत’नेही डीजेमुक्तीसाठी गणेशोत्सवाच्या आगमनापासूनच जनजागृतीसाठी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. तिची दखल घेऊन पोलिसांनी डीजेमालकांवर गणेश आगमन मिरवणुकीत गुन्हे दाखल केले. त्यानंतर साताऱ्यातील न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
एका प्रकरणात साताऱ्यातील प्रसिद्ध डीजेमालकाला न्यायालयाने नोटीस बजावली. यापुढे तुमच्याकडून आवाजाचे उल्लंघन झाल्यास १० लाख रुपये दंड करण्यात येईल, असे न्यायालयाने नोटिसीमध्ये नमूद केले. डीजेविरोधात न्यायालयानेच दखल घेतल्याने इतर डीजेमालकांना यातून धडा घेण्यासारखे आहे, असे पोलिसांनी सांगितले.
एरवी न्यायालयात दंड भरून डीजेमालक आपली सुटका करून घेत होते; परंतु आता यापुढे आवाजाचे उल्लंघन झाल्यास १० लाख दंड करण्याचे न्यायालयाने सांगितल्याने यंदा विसर्जन मिरवणुकीत निश्चित फरक पडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
डीजेच्या आवाजाचे पुन्हा उल्लंघन झाल्यास १० लाख रुपये दंड केला जाईल, अशी नोटीस न्यायालयाने संबंधित डीजेमालकाला बजावली आहे. यातून इतर व्यावसायिकांनी बोध घेण्यासारखे आहे. नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या. -डाॅ. वैशाली कडूकर, अपर पोलिस अधीक्षक, सातारा