महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:01 IST2019-10-24T16:56:14+5:302019-10-24T17:01:38+5:30
Satara Vidhan Sabha Election 2019: सातारकरांनी मतांद्वारे उत्तर दिले Maharashtra Election Result 2019:

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार
सातारा : राज्यभरातून लक्षवेधी ठरलेला आणि भाजपा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा केलेला सातारा जिल्हा कोणाचा बालेकिल्ला आहे, याचे सातारकरांनी मतांद्वारे उत्तर दिले आहे. एकूण आठ विधानसभा मतदारसंघ असलेल्या साताऱ्यामध्ये युती आणि आघाडीला निम्या निम्या जागा वाटून दिल्या आहेत. तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे यांना पराभव पहावा लागणार आहे.
साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले आहेत. येथे राष्ट्रवादीचे आमदार होते. तर फलटणमध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण विजयी झाले आहेत. साताऱा शहरातून भाजपात गेलेले शिवेंद्रराजे भोसले जिंकले आहेत. वाईतून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, कराड दक्षिणमधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गड राखला आहे. कराड उत्तरमधून राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत. तर पाटणमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि माण खटावमधून भाजपाचे जयकुमार गोरे विजयी झाले आहेत.
यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा, भाजपा शिवसेनेला प्रत्येकी 2 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. युती आघाडीला 4-4 जागा मिळालेल्या असताना लोकसभेला मात्र पोटनिवडणुकीत उदयनराजें पराभवाच्या छायेत आहेत. मतमोजणी अद्याप सुरू असून उदयनराजे तब्बल 86224 मतांनी पिछाडीवर आहेत. एवढी मोठी पिछाडी मोडणे आता अशक्य आहे. यामुळे समसमान सुटलेल्या या जिल्ह्यात लोकसभेच्या विजयामुळे आघाडीचे पारडे जड झाले आहे. राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्यामुळे साताऱ्यावर आघाडीचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उदयनराजेंच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी सभा घेतली होती. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे, धनंजय मुंडे या दोन मुलुखमैदानी तोफांना सभा घ्यायला लावून जोर लावला होता. पवार यांची ही खेळी यशस्वी ठरली आणि सातारा कोणाचा यावरही उत्तर शोधले.