भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून तीस फूट खोल कोसळला, चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 19:26 IST2021-09-05T19:26:15+5:302021-09-05T19:26:26+5:30
चालकाला डुलकी लागल्यानेच हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून तीस फूट खोल कोसळला, चालक गंभीर जखमी
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवराज पेट्रोलपंपाजवळ रविवारी पहाटे पाच वाजता भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून तीस फूट खोल कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे हा अपघात झाला तेव्हा सर्व्हिस रस्त्यावर एकही वाहन नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. चालकाला डुलकी लागल्यानेच हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, अहमदाबादहून बेंगलोरकडे मालट्रक (केए ५१ एबी ४४७०) निघाला होता. साताऱ्यातील शिवराज पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालट्रक उड्डाणपुलावरून तीस फूट खाेल कोसळला. मोठा आवाज झाल्याने महामार्गालगत राहाणारे आजूबाजूचे नागरिक झोपेतून जागे झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ट्रकमधून बाहेर काढले. यात चालक गंभीर जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळी आठपर्यंत ट्रक सर्व्हिस रस्त्यावरच होता. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. सरतेशेवटी शहर पोलिसांनी घटनास`थळी धाव घेऊन क्रेनच्या साह्याने ट्रक रस्त्यातून बाजूला केला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या अपघातात ट्रकची समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.