सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेसर, बीम लाईटवर बंदी; पोलिस अधीक्षकांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:57 IST2025-08-14T15:56:32+5:302025-08-14T15:57:21+5:30
कलम १६३ प्रमाणे प्रतिबंध, अन्यथा गुन्हे दाखल होणार

सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेसर, बीम लाईटवर बंदी; पोलिस अधीक्षकांचे आदेश
सातारा : जिल्ह्यात गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीत प्लाझ्मा, बीम लाईट, लेसर बीम लाईट व प्रेशरमीडच्या वापरावर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी निर्बंध घातले आहेत. जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल, त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यात ८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेशमूर्ती आगमन, गणेशमूर्ती विसर्जन, असे सण साजरे होत आहेत. या उत्सवामध्ये मिरवणुकीवेळी गणेश मंडळे त्यांच्या वाद्यांमध्ये व स्टेरिओ सिस्टीममध्ये प्लाझ्मा लाईट, लेसर बीम लाईट व प्रेशरमिडचा वापर करतात.
या प्लाझ्मा बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे व कर्णकर्कश आवाजामुळे श्रवण यंत्रावर, डोळ्यांवर, हृदयास इजा होते. तसेच आरोग्यावरही धोका निर्माण होतो. रस्त्यावरून वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघातही घडू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सारासार विचार करून या उत्सवामध्ये लेसर लाईटच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत.
मिरवणुकीदरम्यान अशा प्रकारची विद्युत उपकरणे निदर्शनास आल्यास संबंधितावर तातडीने गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशाराही पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे.