Satara: यशवंत बँकेचा मुद्दा थेट अमित शाहांच्या दरबारात!, भाजप अंतर्गत कुरघोड्यांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:03 IST2025-05-07T16:02:44+5:302025-05-07T16:03:10+5:30
चरेगावकर यांच्याबाबत तक्रार

Satara: यशवंत बँकेचा मुद्दा थेट अमित शाहांच्या दरबारात!, भाजप अंतर्गत कुरघोड्यांची चर्चा
सातारा : भाजपचे नेते व राज्य सरकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या नेतृत्वाखालील यशवंत सहकारी बँक वर्षभरापूर्वी पुन्हा अडचणीत आल्याचे समोर आले. ठेवीदारांचे पैसे वेळेवर परत मिळत नसल्याने ठेवीदारांच्यात अस्वस्थता पसरली. त्यावेळी शेखर चरेगावकर यांनी यातून पूर्णपणे बाहेर होत सक्षम नेतृत्वाच्या ताब्यात कारभार दिला. आता या बँकेत मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोप करत त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी शिष्टमंडळाला घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्यामुळे भाजप अंतर्गत कुरघोड्यांची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू झाली आहे.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे सहकारमंत्री असताना शेखर चरेगावकर हे त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यावेळी त्यांनी सहकार परिषद अध्यक्षपदाची धुरादेखील शेखर चरेगावकर यांच्याच खांद्यावर दिली होती. पुढे चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरऐवजी पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. साहजिकच तेथील विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला.
नाराज मेधाताईंना पुढे खासदारकी बहाल केली असली तरी आपल्या हक्काचा मतदारसंघ गेला याची सल त्यांच्या मनातून गेलेली दिसत नाही. म्हणून तर चंद्रकांत पाटलांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या असणाऱ्या शेखर चरेगावकरांना विरोध करणाऱ्या लोकांना बरोबर घेत मेधाताईंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेत निशाणा साधल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.
यशवंत सहकारी बँक ही मूळची फलटणची. अवसानात गेलेली ही बँक सन २००८ मध्ये शेखर चरेगावकर यांनी ताब्यात घेऊन त्याचा कारभार गतिमान करण्याचा प्रयत्न केला. त्याला ऊर्जितावस्था मिळवली. बँकेचा व्यवसाय ४०० कोटींच्या घरात गेला. दरम्यान, कोरोना काळात चरेगावकर यांचे व्यक्तिगत असलेले व्यवसाय अडचणीत आले. त्यातच काही कर्जदारांनी चरेगावकर यांच्या वाई अर्बन बँकेतील थकीत कर्जाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांच्या यशवंत बँकेच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेतला. त्यात चरेगावकरांना यशवंत बँकेच्या अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले.
त्यानंतर नव्या अध्यक्षांनी वसुलीबाबत कठोर भूमिका घेतल्या. पण, बँकेचा ताळेबंद व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे ठेवीदारांना वेळेत व पुरेसे पैसे मिळत नसल्याने या बँकेची प्रतिमा पुन्हा मलिन झाली आहे. आता तेथे इतर कारभारी कारभार पाहत आहेत. पण, अमित शाहांकडे झालेल्या तक्रारींमुळे पुन्हा एकदा चरेगावकर मात्र चर्चेत आले आहेत.
नेमकी काय आहे तक्रार?
- यशवंत बँकेच्या १४० कोटींपैकी १२७ कोटींचे कर्ज हे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या कुटुंबीयांसह त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या नावावर आहे.
- कर्ज देताना पुरेसे तारण घेतलेले नाही. नियमांचे उल्लंघन करीत कर्ज दिले आहे.
- बँकेमध्ये सुमारे १२५ कोटींची कर्जे ही बेनामी आहेत.