वडूज येथील जवान मयुर यादव यांचा अपघाती मृत्यू, वडूज शहरावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 18:58 IST2023-04-17T18:58:18+5:302023-04-17T18:58:26+5:30
अंबाला ( पंजाब) कँम्प येथील दुर्घटना.

वडूज येथील जवान मयुर यादव यांचा अपघाती मृत्यू, वडूज शहरावर शोककळा
शेखर जाधव
वडूज: येथील जवान मयुर जयवंत यादव ( वय- २९ ) यांचे अंबाला ( राज्य - पंजाब) कँम्प येथे देशसेवा बजावताना अपघाती मृत्यू झाला. ही बातमी समजताच वडूज शहरावर शोककळा पसरली. मृत मयुर यादव यांचे पार्थिव मंगळवार दिनांक १८ रोजी दुपारी बारा पर्यंत वडूजमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मयुर जयवंत यादव हे १४५ बटालियन मध्ये लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना मोटारसायकल वरून जोडीदारांसोबत जात असताना स्पीड ब्रेकर वरून जवान मयुर खाली पडले असता त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने उपचारासाठी अंबाला ( पंजाब) येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सोमवार दिनांक १७ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत जवान मयुर यादव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच वडूज शहरासह विद्यालयावर शोककळा पसरली होती.
मृत जवान मयुर यादव यांच्या पश्चात वडील सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक जयवंत यादव ,आई, भाऊ हर्षद , पत्नी, तीन वर्षांची आदविता ही मुलगी आहे. अंबाला ( पंजाब) येथून त्यांचे पार्थिव दिल्लीतून विमानाने पुणे येथील विमानतळावर मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यत पोहचणार आहे. पुणे येथून वाहनाने वडूजमध्ये दुपारी बारा पर्यंत त्यांचे पार्थिव पोहचेल अशी माहिती सुत्रांनी दिली. पार्थिवा सोबत त्यांचे भाऊ हर्षद यादव व मिल्ट्रीचे आँफिसर आहेत.