तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त; दोन पोलिस काॅन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवरही गुन्हा
By दत्ता यादव | Updated: March 13, 2023 20:31 IST2023-03-13T20:30:52+5:302023-03-13T20:31:11+5:30
धमक्यांना कंटाळून तरुणाने पोलिस वसाहतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त; दोन पोलिस काॅन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवरही गुन्हा
सातारा : म्हसवड, ता. माण येथील नवनाथ दडस याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून म्हसवड पोलिस ठाण्यात दोन पोलिस काॅन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा नवनाथ दडस (काॅन्स्टेबल म्हसवड पोलिस ठाणे), तिची बहीण अनिता लाला गाडेकर (काॅन्स्टेबल, फलटण ग्रामीण पोलिस ठाणे) या दोघींचे वडील लाला नागू गाडेकर, आई सीताबई लाला गाडेकर (सर्व रा. गाडेकरवस्ती भाटकी, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवनाथ दडस हा कोथळे, ता. माळशिरस येथे शेती करत होता. पोलिस दलात असलेली पत्नी शिल्पासह तो म्हसवडमधील पोलिस वसाहतीमध्ये राहत होता. काैटुंबिक वादातून संशयितांनी म्हसवड व गाडेकरवस्ती भाटकी येथे नवनाथ याला वारंवार धमक्या दिल्या.
या धमक्यांना कंटाळून नवनाथ याने २५ फेब्रुवारी रोजी म्हसवडमधील पोलिस वसाहतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत नवनाथची बहीण शांताबाई हिराचंद वलेकर (वय ३५, रा. कोथळे, ता.माळशिरस, जि. सोलापूर) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोन पोलिस काॅन्स्टेबल बहिणींवर गुन्हा दाखल केला.