Satara: बाजार समितीत तीस लाखांचा अपहार, पाटणच्या सभापतींसह २१ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:50 IST2025-05-15T11:50:10+5:302025-05-15T11:50:43+5:30
लेखापरीक्षकांची फिर्याद

Satara: बाजार समितीत तीस लाखांचा अपहार, पाटणच्या सभापतींसह २१ जणांवर गुन्हा
कऱ्हाड : पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बुधवारी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखापरीक्षक रमेश किसन बागुल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार बाजार समितीचे तत्कालीन सभापती, उपसभापती, संचालक, सचिव तसेच पेट्रोल पंप विभागप्रमुख अशा २१ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यापैकी सचिवाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे.
सभापती रेखा दादासो पाटील (रा. निसरे), उपसभापती अभिजीत शंकरराव जाधव (रा. तारळे), संचालक अरविंद पांडुरंग जाधव (रा. लेंढोरी), अधिक मारुती माने (रा. मानेगाव), सुहास जगन्नाथ माने (रा. राहुडे), राजाराम मारुती मोरे (रा. जांभूळवाडी-कुंभारगाव), सुभाष बाबूराव पाटील (रा. मंद्रुळकोळे), शहाबाई सखाराम यादव, (रा. गारवडे), शंकर हैबती सपकाळ (रा. मालदान), श्रीरंग शामराव मोहिते (रा. बनपुरी), उत्तम सखाराम जाधव (रा. सणबूर), आनंदा परशराम डुबल (रा. आडुळ), सीताराम ज्ञानदेव मोरे (रा. डोंगळेवाडी), रामदास परशराम कदम (रा. नाडोली), शरद विश्वनाथ राऊत (रा. पाटण), आनंदराव सीताराम पवार (रा. मल्हारपेठ),
जगन्नाथ विठ्ठल जाधव (रा. मेंढोशी), सचिव हरीष बंडू सूर्यवंशी (रा. पाटण), तारळे पेट्रोल पंप विभागप्रमुख राजेंद्र भगवान पवार (रा. मल्हारपेठ), मानेगाव पेट्रोल पंप विभागप्रमुख दिलीप महादेव उदुगडे (रा. नवसरी) व राजाराम रामचंद्र नाईक (रा. मानेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण बाजार समितीचे कामकाज मल्हारपेठ येथून चालविले जाते. बाजार समितीच्या एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्याबाबतचा आदेश लेखापरीक्षक रमेश बागुल यांना मिळाला होता. त्यानुसार ११ जुलै २०२४ रोजी लेखापरीक्षक बागुल हे बाजार समितीच्या लेखापरीक्षणासाठी मल्हारपेठ येथे गेले. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ जुलै ते ३० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान बाजार समितीचे लेखापरीक्षण केले.
पेट्रोल पंपावरील रक्कमेचा गैरप्रकार..
लेखापरीक्षणासाठी त्यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडून मुदतवाढ घेतली होती. लेखापरीक्षणाअंती १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत बाजार समितीच्या मानेगाव आणि तारळे येथील पेट्रोल पंपावर हातावरील रोख शिल्लक, व्हाउचर रक्कम, मागील स्टॉकमधील फरकाची रक्कम, आदी रकमेचा अपहार झाल्याचे दिसून आले. बाजार समितीचे तत्कालीन सभापती, उपसभापती, संचालक, सचिव, तसेच पेट्रोल पंप विभागप्रमुखांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी संगनमत करून ३० लाख ३२ हजार ५४१ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षक रमेश बागुल यांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले तपास करीत आहेत.