Sangli: गणेश आगमन मिरवणुकीचे शुटिंग करताना डीजेमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू, मिरजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:46 IST2025-08-28T11:45:53+5:302025-08-28T11:46:27+5:30
मोबाईलवर चित्रीकरण करताना कोसळला

संग्रहित छाया
मिरज : मिरजेत गणेश आगमन मिरवणुकीत बुधवारी रात्री नऊ वाजता डीजेच्या दणदणाटात एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. बाबासाहेब कलगुटगी (वय ६०) यांना मिरवणुकीत डीजे वाजत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मिरजेत बुधवारी गणेश आगमन मिरवणुकीत अनेक मंडळांनी डीजेचा जोरदार वापर केला. रात्री उशिरापर्यंत डीजेचा दणदणाट सुरू होता. वडर गल्ली गणेश मंडळानेही डीजेसह मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत मंडळाचा कार्यकर्ता असलेले बाबासाहेब कलगुटगी हा सुद्धा ट्रॅक्टरवर बसले होते. मिरवणूक रात्री नऊ वाजता मार्केट परिसरात आली असताना बाबासाहेब हे तेथे मोबाईलवर चित्रीकरण करत होते.
डीजेचा दणदणाट सुरू असताना अचानक बाबासाहेब तेथेच कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. कलगुटगी यांना पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यातच कानठळ्या बसवणाऱ्या कर्कश आवाजाने त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यास झटका आल्याचा अंदाज आहे. बाबासाहेब हे मुरूम पुरवठ्याचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता.
नियमाचे उल्लंघन
मिरज शहरात मिरवणुकीत मंडळांनी डीजेचा वापर करू नये यासाठी गेले महिनाभर पोलिसांनी प्रबोधन मोहीम राबवली होती. मात्र बुधवारी गणेश आगमन मिरवणुकांमध्ये अनेक मंडळांनी डीजेचा वापर करून दणदणाट केला. या दणदणाटात एकाचा जीव गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.