Sangli Municipal Election 2026: भाजपच्या उमेदवारीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:01 IST2025-12-25T18:59:08+5:302025-12-25T19:01:29+5:30
मुंबईत बैठक : यादीवर होणार शिक्कामोर्तब, इच्छुकांचे लागले लक्ष

Sangli Municipal Election 2026: भाजपच्या उमेदवारीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून, उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच आहे. एकेका जागेसाठी पाच ते सहा जण इच्छुक आहेत. उमेदवारीवरून पक्षात एकमत होताना अडचणी येत आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवार यादीचा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. त्यासाठी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस व भाजप कोअर कमिटीची बैठक होत आहे. उमेदवारी निश्चितीवर फडणवीसच अंतिम निर्णय घेणार असल्याने या बैठकीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
यंदा भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. तब्बल साडेपाचशेहून अधिक जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील यांनी मुलाखतीचे सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीच्या दोन बैठकाही झाल्या.
या बैठकीत उमेदवारांची यादी, मित्रपक्षांच्या अपेक्षांवर चर्चा करण्यात आली. मित्रपक्ष शिंदेसेना, रिपाइं, जनसुराज्य पक्षाने संभाव्य उमेदवारांची नावे भाजपला कळविली आहेत; पण राष्ट्रवादी (अजित पवार)ने मात्र उमेदवारांची यादी, जागांचा प्रस्ताव भाजपकडे दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) स्वतंत्र लढण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, भाजपमध्येही उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. एकेका जागेसाठी पाच ते सहा इच्छुक आहेत. त्यात समर्थक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, यासाठीही फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे काही प्रभागांतील उमेदवारीवर पक्षात एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे उमेदवार यादीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे.
मुंबईत गुरुवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री फडणवीस व कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला आमदार गाडगीळ, खाडे, इनामदार, देशपांडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित राहणार आहेत. बैठकीत उमेदवार निश्चितीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय देतील. तो साऱ्यांनाच मान्य असेल, असे पक्षातून सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईतील बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
चार ते पाच प्रभागांत पेच
महापालिका क्षेत्रातील चार ते पाच प्रभागांत उमेदवार निश्चितीवरून भाजपची कोंडी झाली आहे. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला तर काही प्रभागात अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच निर्माण झाला आहे. त्यात भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांत इनकमिंग झाले आहे. त्यामुळे या जागेवर जुना-नवा वादही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून आता पक्षश्रेष्ठी कसा मार्ग काढतात, याकडे लक्ष लागले आहे.
शिंदेसेना, रिपाइंला धाकधूक
भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असल्याने जागावाटपात शिंदेसेना व रिपाइंच्या पदरी काय पडणार, याची धाकधूक नेत्यांना लागली आहे. शिंदेसेनेकडून २० जागांची मागणी झाली असली तरी चार ते पाच जागांवर सहमती होऊ शकते. रिपाइं व जनसुराज्य पक्षाला किती जागा मिळतात, याची उत्सुकता लागली आहे.