विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात, विश्वजित कदम बंडखोरीचे सारथ्य करणार?

By हणमंत पाटील | Published: April 12, 2024 11:53 AM2024-04-12T11:53:18+5:302024-04-12T11:55:27+5:30

हायकमांडच्या आदेशानंतर काय ?

Vishwajit Kadam will spearhead Vishal Patil's rebellion in the Sangli Lok Sabha elections | विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात, विश्वजित कदम बंडखोरीचे सारथ्य करणार?

विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात, विश्वजित कदम बंडखोरीचे सारथ्य करणार?

हणमंत पाटील

सांगली : सांगली लोकसभेच्या रणांगणात एकाकी पडलेल्या विशाल पाटील यांंच्या बंडखोरीचे सारथ्य काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम शेवटपर्यंत करणार का, वंचित, ओबीसी व स्वाभिमानीचा पाठिंबा मिळणार का, आघाडी धर्म पाळण्यासाठी ऐनवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी साथ सोडली, तर कार्यकर्ते पाठीशी राहणार का, पक्षाचा ए-बी फार्म न मिळाल्यास अपक्ष चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचणार का, अशा विविध राजकीय प्रश्नांच्या चक्रव्यूहात विशाल पाटील अडकले आहेत.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. गतपंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर साधारण साडेतीन लाख मते त्यांनी मिळविली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून आपण सहज मैदान मारू या भ्रमात ते होते. मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगलीची जागा दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ऐनवेळी उद्धवसेनेत प्रवेश करून मिळविली. त्यानंतर विशाल पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे नेते व पदाधिकारी खडबडून जागे झाले.

डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ते मुंबई व दिल्लीतील हायकमांडला भेटले. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने या जागेवरील दावा सोडू नये म्हणून आक्रमक भूमिका घेतली. मात्र, या काळात मविआच्या पुलाखालून बरेच पाणी गेले. त्यामुळे सांगलीच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, या भूमिकेवर येऊन काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे विशाल पाटील लोकसभेच्या रणांगणात एकाकी पडले.

हायकमांडच्या आदेशानंतर काय ?

मविआची सांगलीची जागा उद्धवसेनेला जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी पलूस येथे एकत्रित पत्रकार परिषद बुधवारी घेतली. मविआने सांगलीच्या जागेचा गांभीर्याने विचार करून फेरनिर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी दोन दिवसांची मुदतही दिली आहे. अन्यथा बंडखोरीचा अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे. याचवेळी सांगली जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी महिन्यापूर्वी पक्ष विसर्जित करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तसा निर्णय घेऊन विशाल पाटील यांच्या बंडखोरीला साथ देणार का, ऐनवेळी हायकमांडचे आदेश आल्यानंतर याच नेत्यांनी माघार घेतल्यास कार्यकर्ते बंडखोरी सोबत राहणार का ? या चक्रव्यूहात विशाल पाटील सापडले आहेत.

वंचित, स्वाभिमानी व ओबीसी पक्षाची साथ मिळेल का ?

सांगली लोकसभेत वंचित व स्वाभिमानी संघटनेने उमेदवार उभे केलेले नाहीत. दोन्ही पक्षाचे नेते मविआविषयी नाराज आहेत. ते विशाल पाटील यांना पाठिंबा देतील का? ओबीसी पक्षाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेडगे यांची भेट घेऊन त्यांनाही पाठिंब्यासाठी साकडे घातले आहे. या सर्वांची साथ घेऊन लोकसभेच्या चक्रव्यूहातून मार्ग काढण्याचे आव्हान विशाल पाटील यांच्यासमोर आहे.

Web Title: Vishwajit Kadam will spearhead Vishal Patil's rebellion in the Sangli Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.