Sangli Municipal Election 2026: उद्धवसेना उमेदवाराच्या आईकडून विषारी द्रव्य प्राशन, अर्ज माघारीसाठी दबावचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:38 IST2026-01-07T16:37:32+5:302026-01-07T16:38:07+5:30
विशालसिंग रजपूत यांचा आरोप : पोलिसांत तक्रार नाही, शासकीय रुग्णालयाच्या परिसरात वाद

Sangli Municipal Election 2026: उद्धवसेना उमेदवाराच्या आईकडून विषारी द्रव्य प्राशन, अर्ज माघारीसाठी दबावचा आरोप
सांगली : शहरातील प्रभाग १६ मधील उद्धवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार उमर गवंडी यांच्या आई मुमताज गवंडी यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचा प्रकार समोर आला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दबावाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबतची कोणतीही तक्रार पोलिसात दाखल नव्हती. तसेच उमेदवार गवंडी यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला.
याबाबत माहिती अशी की, उद्धवसेने(ठाकरे) च्या प्रभाग १६ चे उमेदवार उमर गवंडी निवडणूक लढवीत आहेत. मंगळवारी त्यांच्या आईने औषध प्राशन केले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. शासकीय रुग्णालय प्रशासनानेही त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले. उमेदवारी मागे घेण्याच्या त्रासामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख रजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
या प्रकाराने काहीकाळ प्रभागात तणावाचे वातावरण होते. याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार रात्री उशिरापर्यंत दाखल झाली नव्हती. याबाबत उमेदवार उमर गवंडी यांनी काहीही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शासकीय रुग्णालयाच्या परिसरात वाद
सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी अडीच वाजता प्रभागातील दोन्ही विरोधी उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यावेळी दोन्ही गटांत वादावादी झाली. एकमेकांवर उघडपणे आरोप करण्यात आले. परिसरात यावेळी मोठी गर्दी झाली होती. रुग्णालयात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी याबाबत मध्यस्थी करीत जमाव हटविला. याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले.