Sangli: आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार, मिरजेत भोंदू वैद्य व एजंटांचा महिलेला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:20 IST2024-12-30T13:18:05+5:302024-12-30T13:20:28+5:30
, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sangli: आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार, मिरजेत भोंदू वैद्य व एजंटांचा महिलेला गंडा
मिरज : मिरजेत उपचारासाठी येणाऱ्या कर्नाटकातील रुग्णांना आयुर्वेदिक उपचाराच्या बहाण्याने गंडा घालण्याचे प्रकार सुरू आहेत. या भोंदू वैद्य व एजंटांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिरजेत कर्नाटकातून व परजिल्ह्यातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. बसस्थानक व रेल्वे परिसरातील एजंट अशा रुग्णांना हेरून आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली त्यांची फसवणूक करीत आहेत. रुग्णांना गाठून दवाखान्यात महागड्या उपचारापेक्षा रामबाण आयुर्वेदिक उपचाराने आजार बरा करण्याची खात्री देण्यात येते. यासाठी भोंदू वैद्यांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात आयुर्वेदिक औषधाची दुकाने थाटली आहेत.
एजंट रुग्णांना अशा दुकानात घेऊन गेल्यानंतर दुकानदार कोणताही रोग हमखास बरा होण्याचे औषध देतात. या आयुर्वेदिक औषधांसाठी १० ते १५ हजार रुपये उकळण्यात येतात. अशा औषधांचा कोणताही फायदा होत नाही. मात्र, याबाबत तक्रार करणाऱ्या रुग्णांना दमदाटी करून पिटाळून लावण्यात येते.
गरीब व अशिक्षित रुग्णांची अशी दररोज फसवणूक सुरू आहे. दुकाने थाटून बसलेले भोंदू वैद्य व एजंट परजिल्ह्यातील आहेत. बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात कंगवा व इतर साहित्य विक्रीच्या बहाण्याने बसलेल्या एजंट महिला गरीब रुग्णांना उपचाराबाबत भूलथापा देऊन आयुर्वेदिक उपचाराची गळ घालत आहेत.
दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील मंगसुळी येथून डोळ्याच्या उपचारासाठी आलेल्या गरीब वृद्ध महिलेस आयुर्वेदिक उपचाराच्या बहाण्याने गंडा घालण्यात आला. फसवणूक झालेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीने वारंवार रुग्णांना फसविण्याचे प्रकार सुरू आहेत.
रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा बहाणा
मिरजेतील स्टेशन चौक ते पुढे बस स्थानकापर्यंत रस्त्यावर किरकोळ वस्तू घेऊन विक्रेत्या म्हणून बसलेल्या महिला रस्त्यावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आजारावर औषध मिळते, असे सांगतात. तेथून दुकानात नेल्यावर गंडा घालणारा भोंदू वैद्य तयारच असतो. कोणत्याही आजारावर तेथे औषधं मिळते. स्वस्तात औषधं असल्याचे सांगून वेगवेगळी औषधं पूड एकत्र करण्यात येते. संबंधित रुग्नाच्या व्याधीसाठी औषध तयार केल्यानंतर त्याची किमत हजारात होते. तयार केलेले औषध घ्यावेच लागेल , अशी सक्ती करण्यात येते. एखादी तक्रार पोलिसांत गेल्यास औषधासाठी घेतलेली रक्कम रुग्णास परत देऊन प्रकरण मिटविण्यात येते.