काँग्रेसमध्ये सत्ता भोगलेले आता स्वार्थासाठी पळून गेले, विश्वजीत कदम यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:47 IST2025-12-24T17:46:56+5:302025-12-24T17:47:50+5:30
राज्यातील सत्ता बदलाची सुरुवात सांगलीतून करूया : विशाल पाटील

काँग्रेसमध्ये सत्ता भोगलेले आता स्वार्थासाठी पळून गेले, विश्वजीत कदम यांचा हल्लाबोल
सांगली: काँग्रेसने जिल्ह्यातील आणि महापालिका शहरातील नेत्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आणि महत्त्वाच्या पदांवर त्यांना नियुक्त केले. मात्र, काही मंडळी सत्ता भोगून स्वार्थासाठी पळून गेली आहेत. त्यांची चिंता करू नका. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बळावर आणि मतदारांच्या विश्वासावर महापालिकेची निवडणूक लढविली आणि जिंकली जाईल, असा विश्वास आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
सांगलीत मंगळवारी काँग्रेस कमिटीमध्ये पक्षाचे नवे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. कदम बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विक्रमसिंह सावंत, युवा नेते जितेश कदम, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार, अय्याज नायकवडी यांसह इतर प्रमुख उपस्थित होते. डॉ. कदम यांच्या हस्ते राजेश नाईक यांना निवडीचे पत्र देण्यात आले आणि पदग्रहण सोहळा पार पडला.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, मिरज आणि सांगलीतील अनेक प्रभावशाली काँग्रेस नेत्यांनी पक्षाला सोडून दिल्याने काही फरक पडणार नाही. देश आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या भीतीने आणि आकर्षणामुळे काही लोक त्यांना जाऊ लागले आहेत. महापालिकेत काँग्रेसकडून ज्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले, त्यांनी पक्षाचा पाठ असताना काळ्या काळात साथ सोडली आहे. त्यांना जाऊ द्या, आपण पूर्ण ताकदीने लढू आणि जिंकलो पाहिजे. सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण निवडणूक लढवणार आहोत.
राज्यातील सत्ता बदलाची सुरुवात सांगलीतून करूया : विशाल पाटील
खासदार विशाल पाटील म्हणाले, जातीयवादी शक्तींना थांबवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. देश आणि राज्यात सत्ता बदलाची सुरुवात सांगलीतूनच करायची आहे. काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे. सांगली हे काँग्रेसचे बालेकिल्ला होते आणि ते पुन्हा जिंकायचे आहे. महापालिकेच्या सत्तेत जाण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहायचे आहे, त्यासाठी आमची पूर्ण ताकद तुमच्या सोबत असेल.
मंगेश चव्हाण झाले निवडणुकीचे प्रमुख
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मंगेश चव्हाण इच्छुक होते आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांची शिफारस केली होती, मात्र राजेश नाईक यांना संधी मिळाली. म्हणून मंगेश चव्हाण यांना महापालिका निवडणूक प्रमुख व प्रचार प्रमुख पदे देण्यात आली. त्यांनाही डॉ. कदम यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
कुणी कितीही भांडणं लावली तरी फरक पडणार नाही
काँग्रेसचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची निवडही डॉ. विश्वजित कदम यांनीच केली असून, आम्ही एकमताने आणि एकदिलाने काम करत आहोत. कुणी कितीही भांडणं लावली किंवा तेल ओतले तरी काही फरक पडणार नाही, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी विरोधकांना लगावला.