सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात झाली होती चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:47 IST2026-01-28T18:46:37+5:302026-01-28T18:47:39+5:30
युतीचा आणखी एक फाॅर्म्युला समोर

संग्रहित छाया
सांगली : महापालिकेत भाजप व शिंदेसेना एकत्रित सत्ता स्थापन करून काठावरचे बहुमत करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सोबत घेऊन मजबूत बहुमत मिळण्यासाठी मुंबईत मंगळवारी खलबते सुरू झाली आहेत. सांगलीत सत्ता स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीने अडीच वर्षे उपमहापौर व दोन वर्षे स्थायी समितीचे सभापतिपद मागितल्याची चर्चा आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला एका जागेची गरज आहे. शिंदेसेनेचे दोन नगरसेवक भाजपसोबत आल्यास महापौरपदाची निवडणूक पार पडले. पण स्थायी समिती सभापतिपदाचा पेच कायम राहणार आहे. स्थायीत वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपला दोन्ही राष्ट्रवादी पक्षांपैकी एकाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यात राज्यात महायुतीत सहभागी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या पाठिंब्याचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतील, असे स्थानिक नेत्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना एकत्र आल्यास महायुतीचे संख्याबळ ५७ वर पोहोचणार आहे. महापालिकेत केवळ काँग्रेस हाच एकमेव विरोधी पक्ष राहील. त्यांचे संख्याबळ १८ आहे. त्यामुळे महापालिकेचा गाडा एकहाती हाकण्यात कोणतीच अडचण राहणार नाही. तसेच गतवेळीप्रमाणे फुटाफूट होण्याचा धोकाही कमी होईल, असा तर्क लढवला जात आहे. पण राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला काही स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी प्राथमिक चर्चा झाली असून भाजपने पाच वर्षे महापौरपद सोडण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षे उपमहापौरपद, तर दोन वर्षे स्थायी समिती सभापतिपदाचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे. भाजपच्या नेत्यांनी मात्र स्थायी समितीचे सभापतिपद देण्यास होकार दर्शविला नाही. आर्थिक चाव्या भाजपकडे ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. उपमहापौर पदावर मात्र दोन्ही पक्षांत तडजोडीची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून दोन दिवसांत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अजित पवार निर्णय घेणार आहेत.
राष्ट्रवादीचा गटनेता आज जाहीर होणार
राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत १६ जागा जिंकून महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. पक्षाच्या गटनेतेपदाची निवडीबाबत शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चार इच्छुकांची नावे दिली आहेत. यामध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडी, करण जामदार व गजानन मगदूम यांचा समावेश आहे. बुधवारी यापैकी एकाचे नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
युतीचा आणखी एक फाॅर्म्युला समोर
महापालिकेत सत्ता स्थापन करण्याबाबत भाजपने अनेक पर्यायावर विचार सुरू केला आहे. त्यात आणखी एक फाॅर्म्युला समोर आला आहे. भाजपकडे ३९ नगरसेवक आहेत. शिंदेसेनेचे दोन व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे तीन नगरसेवकांचा पाठिंबा घेतल्यास संख्याबळ ४४ वर जाते. त्यामुळे स्थायी समितीसह अन्य समितीवर भाजपचे बहुमत होणार आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची फारशी गरज भासणार नाही. त्यात अकोला महापालिकेत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे. मग अकोल्यात भाजप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवत असेल तर सांगलीतही हे शक्य आहे. ते जमणार का ? हे लवकरच स्पष्ट होईल.