Sangli Municipal Election 2026: वंचित, रासप आणि ओबीसी बहुजनची संयुक्त आघाडी, २२ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:30 IST2026-01-05T18:29:19+5:302026-01-05T18:30:57+5:30
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी , रासप, ओबीसी राजकीय आघाडी आणि ओबीसी बहुजन आघाडी या चार पक्षांच्या ...

Sangli Municipal Election 2026: वंचित, रासप आणि ओबीसी बहुजनची संयुक्त आघाडी, २२ उमेदवार रिंगणात
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी, रासप, ओबीसी राजकीय आघाडी आणि ओबीसी बहुजन आघाडी या चार पक्षांच्या आघाडीची घोषणा रविवारी करण्यात आली. प्रस्थापित पक्षांना आव्हान म्हणून आमची आघाडी काम करेल, अशी माहिती आघाडीच्या नेत्यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, बंडू डोंबाळे, बीसी आघाडीचे अजित भांबुरे, रासपचे अजित पाटील, शिवाजी शेंडगे, कालिदास गाढवे, सतीश गारंडे, रवींद्र सोलनकर आदींनी ही माहिती दिली.
अजित पाटील म्हणाले, प्रस्थापित पक्षांना सक्षम पर्याय म्हणून आघाडी तयार केली आहे. सत्ताधारी पक्षांकडून निवडणुका बिनविरोध करून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे राज्यघटनेला धोका आहे. हाच पॅटर्न पुढेही सुरू राहिल्यास भविष्यात निवडणुकाच होणार नाहीत. हे टाळण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत.
सोनवणे म्हणाले, निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही लढणार आहोत. अनेक वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी शहरांची वाट लावली आहे. तीनही शहरे ठेकेदारांच्या ताब्यात गेली आहेत. सत्तेसाठी या पक्षांनी अभद्र युत्या केल्या आहेत. पुन्हा सत्तेत जाऊन शहर लुटायचे कारस्थान आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी आघाडी केली आहे.
आघाडीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. या संयुक्त आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ११ उमेदवार असून, ४ अपक्षांना पाठिंबा दिला आहे. रासपचे ६ आणि ओबीसी राजकीय आघाडीचा एक, असे एकूण २२ उमेदवार संयुक्त आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात आहेत.