Sangli Municipal Election 2026: भाजप नेत्यांची ऐक्य एक्सप्रेस ट्रॅकवर, मनोमिलन घडविण्यात नेत्यांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:05 IST2026-01-07T19:04:47+5:302026-01-07T19:05:05+5:30
पालकमंत्र्यांचा वॉच

Sangli Municipal Election 2026: भाजप नेत्यांची ऐक्य एक्सप्रेस ट्रॅकवर, मनोमिलन घडविण्यात नेत्यांना यश
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमुळे भाजप सतत चर्चेत होता. त्याच वेळी पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आणि स्पर्धा असल्याचेही सतत बोलले जात होते. परंतु, आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. सभा, प्रचार बैठका सुरू झाल्या आहेत. त्यावरून सर्व नेत्यांमध्ये ऐक्य घडवून आणण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आल्याचे दिसून येत आहे. विशेषतः हे मनोमिलन घडवून आणण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात भाजपमध्ये अनेक वर्षे काम केलेले असंख्य नेते आणि कार्यकर्तेही आहेत. या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा प्रस्थापित नेत्यांबरोबर सततचा संपर्क असतो. याशिवाय पक्षाने स्वीकारलेल्या विस्ताराच्या धोरणानुसार गेल्या काही महिन्यांत काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेते एकापाठोपाठ एक पक्षामध्ये आले. त्यांचे त्यावेळी स्वागत करण्यात आले; परंतु त्याही वेळी पक्षातील काही मातब्बर नेते नाराज असल्याची चर्चा ठळकपणे सुरू होती.
वाचा: पक्ष नाही, चिन्हच ओळख, अपक्षांमुळे प्रचारात रंगत; उरले सात दिवस
आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर, प्रकाश बिरजे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार असे नेते पक्षाच्या उभारणीपासून ते पक्षाच्या विस्तारापर्यंत सातत्याने काम करीत आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील या दोघांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्तेही पक्षात आले. त्यामुळे मोठी खळबळ उडणे साहजिक होते. तशी खळबळ उडालीही होती.
अगदी जुने, मधील काळात पक्षात येऊन कार्यरत झालेले आणि अगदी अलीकडे पक्षात आलेले अशा सर्व नेत्यांच्या ऐक्याची खरी कसोटी महापालिका निवडणुकीतच लागणार होती हे स्पष्ट होते. आमदार गाडगीळ सांगली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. आमदार खाडे मिरज विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या निवडणूक प्रचारात अग्रेसर राहून सहभाग घेणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. पक्षात नव्याने आलेल्या जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांनाही उमेदवारीची अपेक्षा होती.
मुळात भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच वीस प्रभागांत रस्सीखेच सुरू होती. मात्र जागा ७८ आणि इच्छुकांची संख्या प्रचंड यामुळे नेत्यांपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. याशिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक माजी नगरसेवक होते.
या सगळ्या वातावरणातच पक्षाच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात आली. ती करताना सगळीकडे शक्य तेवढा समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे असे एकंदर चित्र दिसते आहे. अर्थात उमेदवारीची अपेक्षा असलेल्या अनेकांची निराशा होणेही साहजिक होते; परंतु त्यापैकी काही अपवाद वगळता बहुसंख्य कार्यकर्ते नाराजी बाजूला ठेवून आता पक्षाच्या प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र आहे.
पक्षाकडे उमेदवारी मागणारे आणि ती मिळाली नसली तरी पक्षाच्या कामात सहभागी होणारे कार्यकर्ते हे चित्र एकीकडे निश्चितच आहे. मात्र उमेदवार यादी निश्चित करताना नेत्यांमध्ये बरेच वादविवाद, मतभेद झाले, अशी अशी सतत चर्चा सुरू होती. त्यामुळे या सर्व नेत्यांचा प्रत्यक्ष प्रचारामध्ये कसा सहभाग आणि व्यवहार राहतो याकडे सर्वांचेच बारकाईने लक्ष होते.
व्यासपीठावर आले एकत्र
उमेदवार जाहीर झाल्यानंतर पहिल्याच नियोजनाच्या बैठकीत पक्षाचे सर्व नेते व्यासपीठावर उत्साहाने हजर असल्याचे चित्र दिसत होते. एवढेच नव्हे तर ज्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची सतत चर्चा होती, तेसुद्धा परस्परांमध्ये सुसंवाद करताना दिसून येत होते. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, प्रचाराचा प्रारंभ, प्रचारफेरी, बैठका असे उपक्रम सुरू आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये पक्षाचे नवे, जुने नेते आणि कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र दिसून येत आहे.
पालकमंत्र्यांचा हालचालींवर वॉच
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री पाटील यांचे या संपूर्ण निवडणुकीच्या नियोजनावर आणि प्रचारावर लक्ष दिल्याचे चित्र आहे. राज्यातील तसेच पुण्यातील निवडणुकीचीही त्यांच्यावर जबाबदारी आहे. तरीही सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीकडे ते बारकाईने लक्ष देत आहेत असे पक्षाचे नेते सांगत आहेत.