जयंत पाटील यांच्याभोवतीच्या चार बापूंच्या अभेद्य भिंतीचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:01 IST2024-12-21T16:01:12+5:302024-12-21T16:01:35+5:30

दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधीची प्रतीक्षा

The barrier of the impenetrable wall of four Bapus surrounding Jayant Patil | जयंत पाटील यांच्याभोवतीच्या चार बापूंच्या अभेद्य भिंतीचा अडथळा

जयंत पाटील यांच्याभोवतीच्या चार बापूंच्या अभेद्य भिंतीचा अडथळा

अशोक पाटील

इस्लामपूर : गेली ३५ वर्षे इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. सलग सात विधानसभा निवडणुकीतील मताधिक्याचा आलेख वाढतच गेला. आठव्या विधानसभा निवडणुकीत मतांचा टक्का एकदमच घसरला. याची कारणमीमांसा सुरू असून, त्यामध्ये पाटील यांच्याभोवती चार बापूंची असलेली अभेद्य भिंत हे प्रमुख कारण व अडथळा कार्यकर्त्यांना वाटत आहे. या बापूंच्या भिंतीमुळेच दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नव्या कार्यकर्त्यांना साहेबांपर्यंत पोहचता येत नसल्याचे आता समर्थक उघडपणे बोलू लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीत पाटील यांचे मताधिक्य घटण्याचे एकमेव कारण म्हणजे लाडकी बहीण, ऊस दर व विकास कामांची कामे वर्षानुवर्षे एकाच घरातील कार्यकर्त्यांना मिळणे. त्यामुळे गेली ३५ वर्षे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणे दुरापास्त झाले. त्यामुळे मतदारसंघातील ग्राउंड रियालिटी व वास्तव साहेबांपर्यंत पोहचू शकत नाही. 

उरूण परिसरातील बाळासाहेब पाटील (बापू) यांची राजकीय कारकीर्द राजारामबापू पाटील यांच्यापासून सुरू झाली. स्थानिक पातळीवर त्यांचे राजकारण नसले तरी जयंत पाटील यांच्या राजकीय घडामोडींत सहभाग असतो. त्यांना थेट पाटील यांच्या दरबारात प्रवेश मिळतो. याची चर्चा मात्र कार्यकर्त्यांतून नेहमीच असते. नेर्ले गावचे सरपंच संजय पाटील (बापू) सुध्दा पाटील यांच्या जवळचे मानले जातात. ग्रामीण भागातील निर्णय घेताना संजय पाटील यांचाच शब्द प्रमाण मानला जातो.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील (बापू) सध्या जयंत पाटील यांचे खास असल्याचे मानले जातात. प्रतीक पाटील यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतली, तरी विजय पाटील यांच्या सल्ल्यानेच आणि जयंत पाटील यांच्या आदेशानेच साखर कारखान्यातील कारभार चालतो. त्यानंतर इस्लामपूर शहरातील सर्व कारभार शहाजी पाटील (बापू) यांच्या हाती असला तरी जयंत पाटील हे ॲड. चिमण डांगे (भाऊ) व खंडेराव जाधव (नाना) यांचाही सल्ला घेतात. एकंदरीत, पाटील यांच्या कारभारात चार बापूंना महत्त्व आल्याची चर्चा मात्र मतदारसंघात रंगतदार सुरू आहे.

आमच्या घराण्यातील तीनही पिढ्या राजारामबापू पाटील ते जयंत पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्याबरोबर आहोत. एकनिष्ठतेमुळे पाटील यांचा आमच्यावर विश्वास आहे; परंतु आम्ही कोणालाही अडथळा व अडचण ठरणारे नाहीत. त्यामुळे कधी-कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर रागावण्याचा हक्क आमचे नेते जयंत पाटील यांना आहे. - शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष.

Web Title: The barrier of the impenetrable wall of four Bapus surrounding Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.