Sangli: विस्तारित म्हैसाळच्या इलेक्ट्रिक लाइनसाठी ८० कोटींची निविदा मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:39 IST2025-08-27T19:39:05+5:302025-08-27T19:39:31+5:30
संग्राम जगताप यांची माहिती : विलासराव जगताप यांचा उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

Sangli: विस्तारित म्हैसाळच्या इलेक्ट्रिक लाइनसाठी ८० कोटींची निविदा मंजूर
जत : जत पूर्वभागातील ६५ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला गती यावी यासाठी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जगतापांनी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या इलेक्ट्रिक लाइनच्या टेंडरला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना टेंडर काढण्याचा आदेश दिला व ८० कोटींचे टेंडर निघाल्याची माहिती जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
संग्राम जगताप म्हणाले, विलासराव जगताप यांनी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या ४० किमी रामझिंग मेनच्या इलेक्ट्रिक टेंडर व त्यावरील उच्च दाबाच्या एक ते दोन हजार हॉ. पॉ. १२ मोटारीचे ८० कोटींचे टेंडर निघाले नाही. त्यामुळे डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी तात्काळ संबंधित विभागाचे अभियंता हेमंत गुणाले यांना पाइप जोडणीबरोबर इलेक्ट्रिक लाइन व १२ मोटारीचे टेंडर त्वरित काढण्याची सूचना केली. त्याप्रमाणे शासन स्तरावरून ४० कि.मी. इलेक्ट्रिक लाइन व मोटारीचे ८० कोटींच्या टेंडर काढण्यास मान्यता दिली.
२०२६ पर्यंत काम लागेल मार्गी : संग्राम जगताप
विलासराव जगताप यांचा पाठपुरावा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने टेंडर काढण्याचे आदेश दिल्याने विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल व तालुका दुष्काळमुक्त होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जतच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिल्याबद्दल जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे आभार मानले.