Sangli: सातबाऱ्यावर नोंदीसाठी लाच घेणाऱ्या तलाठी, कोतवालास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:20 IST2025-07-04T19:20:13+5:302025-07-04T19:20:39+5:30
मिरज : सातबारा उताऱ्यावर प्लॉटची नोंद करण्यासाठी अडीच हजार रुपये लाच घेणारे बेळंकी (ता. मिरज ) येथील तलाठी व ...

Sangli: सातबाऱ्यावर नोंदीसाठी लाच घेणाऱ्या तलाठी, कोतवालास अटक
मिरज : सातबारा उताऱ्यावर प्लॉटची नोंद करण्यासाठी अडीच हजार रुपये लाच घेणारे बेळंकी (ता. मिरज) येथील तलाठी व कोतवालास सांगलीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण (वय ५०, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) व कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे (वय ५४, रा. बेळंकी, ता. मिरज) यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळंकी येथील तक्रारदाराच्या भावाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद तलाठी विद्यासागर चव्हाण यांना सांगून मंजूर करण्यासाठी कोतवाल राजाराम वाघमारे यांनी स्वतः व तलाठी चव्हाण यांच्यासाठी अडीच हजार रुपयांची मागणी केल्याने सांगलीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २ रोजी बेळंकीचे तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण, कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे यांच्याकडे पडताळणी केली.
कोतवाल वाघमारे यांनी तक्रारदाराच्या भावाच्या प्लॉटची उताऱ्यावर नोंद घालण्यासाठी तलाठी व स्वतःसाठी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली. तलाठी विद्यासागर चव्हाण यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम राजाराम वाघमारे यांना देण्यास सांगितले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. ३ जुलै रोजी बेळंकी तलाठी कार्यालयात सापळा रचून विद्यासागर सदाशिव चव्हाण यांना बेळंकीत त्यांच्या कार्यालयासमोर तक्रारदाराकडून अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
याबाबत तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण व कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, किशोर कुमार खाडे, पोलिस कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, वीणा जाधव यांनी ही कारवाई केली.