प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, आमदार सत्यजित देशमुख यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:02 IST2024-12-19T17:01:31+5:302024-12-19T17:02:05+5:30
शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. ...

प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, आमदार सत्यजित देशमुख यांची मागणी
शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. वन्यप्राण्यांमुळे शेतीची झालेली नुकसानीची भरपाई शासनाने लवकर द्यावी. वन्यप्राण्यांमुळे होणारे शेती पिकाचे नुकसान रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या विषयी चर्चा करताना केली.
देशमुख म्हणाले, शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये बिबट्या, गव्हा, अजगर, रानडुक्कर आदी वन्यप्राणी व वन्यजीव यांचा मोठ्या प्रमाणात वावर होत आहे. त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीमध्ये हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. दि.१६ रोजी पेठ शिराळा रस्त्यावरती रेठरे धरण गावाजवळ सर्जेराव खबाले (मु.पो.कापरी तालुका शिराळा) यांच्या वरती प्रवासादरम्यान बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सर्जेराव खबाले गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तसेच गेल्या काही वर्षांपूर्वी ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई लवकर द्यावी. तसेच गव्यामुळे शेती पिकाचे नुकसान होत आहे. हजारो हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे तसेच मोकळे पडून राहत आहे.
कार्यवाही करावी
शेतीचे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून गुढे ते बांबरवाडी खुंदलापूर ते मिरुखेवाडी, तसेच रिळे, तडवळे यासह आवश्यक असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा मोठी चर मारणे अत्यावश्यक आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाने संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.