इस्लामपूर परिसरात वादळी पावसाचा धुमाकूळ, अवघ्या दहा मिनिटांत सगळीकडे पाणीच पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 12:20 IST2023-03-16T12:19:52+5:302023-03-16T12:20:20+5:30
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला

इस्लामपूर परिसरात वादळी पावसाचा धुमाकूळ, अवघ्या दहा मिनिटांत सगळीकडे पाणीच पाणी
इस्लामपूर : गेल्या काही दिवसांच्या तापमानवाढीनंतर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास इस्लामपूर, पेठ परिसरात वादळी पावसाने धुमाकूळ घातला. वळवाच्या पावसापेक्षाही मोठ्या सरी कोसळत होत्या. अवघ्या दहा मिनिटांत सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. गटारी ओसंडून रस्त्यावरून वाहत होत्या.
सायंकाळपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर, काही काळ पुन्हा उष्णता वाढली होती. अशा अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याकडून येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, हा अंदाज खरा ठरला.
अर्धा तास हा पाऊस एकसारखा बरसत होता. त्यामुळे गटारी तुंबून पाणी रस्त्यावरून वाहत होते. गटारीच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच गटारीतील अडकलेला कचरा बाहेर काढल्यानंतर पाण्याचा लोंढा बाहेर पडत होता. हे सर्व पाणी रस्त्यावर आले होते. सखल भागातही रस्त्यावर पाणी साचून राहिले होते.