पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली, मिरज स्थानक संवेदनशील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:40 IST2025-04-29T15:39:35+5:302025-04-29T15:40:44+5:30
कर्मचाऱ्यांना ड्युटीवर शस्त्र बाळगण्याचे आदेश

संग्रहित छाया
सांगली : पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून रेल्वेनेही सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केली आहे. पुणे विभागात धावणाऱ्या २४ एक्स्प्रेस रेल्वेमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवून अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबविल्या आहेत.
विशेषतः पुणे स्थानकाला संवेदनशील स्थानक म्हणून घोषित केले आहे. तेथे अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित स्थानकांची अनपेक्षित तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांच्या समन्वयाने स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. पुण्यासह मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर श्वानपथकांद्वारे तपासणी केली जात आहे. सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना शस्त्र बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे विभागातील सुमारे २४ महत्त्वाच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा बलाचे निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रातील गाड्यांमध्ये गस्तीचे काम करत आहेत. संवेदनशील बाबीची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला दिली जात आहे. रात्रीच्या वेळी एक निरीक्षक नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. विविध स्थानकांवर व गाड्यांमध्ये साध्या वेशातील विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवाशांकडून 'रेल मदत' या प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या तक्रारींची नियमितपणे दखल घेतली जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिरज स्थानक संवेदनशील
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मिरज रेल्वेस्थानकही संवेदनशील आहे. या स्थानकात यापूर्वीही अनेकदा गुन्हेगारांची धरपकड झाली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात अनेकदा गुन्हेगारी कारवाया, लुटमारी झाल्या आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहे.