Sangli Politics: संजयकाकांनी कोंडी फोडली; रोहित पाटलांचा सस्पेन्स कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:16 IST2025-11-10T20:16:00+5:302025-11-10T20:16:52+5:30
Local Body Election: तासगावच्या राजकीय पटलावर अद्याप सन्नाटा कायम

Sangli Politics: संजयकाकांनी कोंडी फोडली; रोहित पाटलांचा सस्पेन्स कायम
दत्ता पाटील
तासगाव : भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वाटचालीबाबत असलेली कोंडी फोडली आहे. मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम आहे.
एकीकडे संजय पाटील यांनी भाजपच्या विरोधातच रान उठवण्यास सुरुवात केली असताना, दुसरीकडे आमदार रोहित पाटील मात्र ‘सायलेंट’ राहून जुळवाजुळव करताना दिसून येत आहेत. दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे तासगावच्या राजकीय पटलावर अद्याप सन्नाटा कायम आहे.
भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांपासून फारकत घेत, ‘विकासाची गाडी’ या संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, हे जाहीर करताना नेमकी कोणासोबत हातमिळवणी करणार, याची स्पष्टता नव्हती. सांगलीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांशी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
त्यामुळे संजय काका भाजपच्या विरोधातच निवडणुकीचा अजेंडा राबवत असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले आहे. त्याला भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधाचीदेखील किनार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांनी एकत्र यावे, असे अप्रत्यक्ष संकेत संजय पाटील यांनी दिले असतानाच, नगरपालिकेची निवडणूक मात्र स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काकांच्या या भूमिकेने त्यांच्या राजकीय दिशेचा अंदाज स्पष्ट झाला आहे.
मागील काही दिवसांपासून निवेदने, आंदोलने आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात संजय काका आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांनी संजय काकांनी केलेल्या आरोपांना जाहीर उत्तर दिलेले नाही. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.
मात्र, सायलेंट राहून पडद्याआडून निवडणुकीची जुळवाजुळव सुरू ठेवल्याचे दिसते. दोन्ही नेत्यांच्या या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे मतदारसंघातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे तासगाव तालुक्यात निवडणुकीची वारे वाहताना दिसून येत नाहीत.
संजयकाकांच्या निशाण्यावर भाजप
संजय पाटील यांनी वेळोवेळीच्या आंदोलनांमधून आणि पत्रकार परिषदांमधून सत्ताधाऱ्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर ठेवून त्यांनी भाजपवर घाव घालण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितल्याने भाजपविरोधातील सर्वपक्षीय आघाडीच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.