Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपला रोखण्याची विरोधकांची खेळी फसली, आघाडीची समझोता एक्स्प्रेस रुळावरून घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:08 IST2026-01-17T19:07:16+5:302026-01-17T19:08:33+5:30
मैत्रीपूर्ण लढती, बंडखोरी आणि स्थानिक समीकरणे भाजपच्या पथ्यावर, सर्वपक्षीयातील गटबाजी ही आली समोर, बंडखोरांकडून अनेक ठिकाणी फटका

Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपला रोखण्याची विरोधकांची खेळी फसली, आघाडीची समझोता एक्स्प्रेस रुळावरून घसरली
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडवली आहे. भाजपला बहुमतापासून रोखण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी झाला असला, तरी सत्तेपासून दूर ठेवण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. भाजपने ३९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधकांकडून निवडणुकीपूर्वी मोठ्या आत्मविश्वासाने मांडली जाणारी ‘समझोता एक्स्प्रेस’ निकालाच्या रुळावर टिकू शकली नाही.
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर भाजपला रोखण्यासाठी महायुती, महाआघाडीतील पक्षातून मोर्चेबांधणी केली गेली. या निवडणुकीत भाजपविरोधात सर्वपक्षीय एकत्रित लढ्याची चर्चा होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातील समन्वय भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालात मतांचे विभाजन, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे ही आघाडी कमकुवत ठरली. भाजपने ३९ जागा जिंकत स्पष्ट आघाडी घेतली, तर काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला १६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.
भाजप बहुमताच्या एक पाऊल मागे थांबला असला, तरी विरोधकांना अपेक्षित असलेली एकजूट मतदानात दिसून आली नाही. अनेक प्रभागांत मैत्रीपूर्ण लढती, बंडखोरी आणि स्थानिक समीकरणे भाजपच्या पथ्यावर पडली. भाजपने संघटनात्मक ताकद, आक्रमक प्रचार आणि स्थानिक नेत्यांची बांधणी याचा पुरेपूर फायदा घेतला. दुसरीकडे, विरोधकांचे उमेदवार ठरवताना झालेला विलंब, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वाबाबतची संभ्रमावस्था याचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले.
महाआघाडी व राष्ट्रवादी( अजित पवार) यांना अपेक्षित निकाल लागला नसला तरी भाजपच्या नेतृत्वाला ही जनतेने धक्का दिला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप ५५ जागा जिंकेल असा दावा केला होता. तर भाजपचे स्थानिक नेतेमंडळींना किमान ४५ जागा तरी मिळतील, अशी आशा होती. पण जनतेने भाजपलाही बहुमतापासून दूर ठेवले आहे. गत निवडणुकीत भाजपने ४१ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यातही दोन जागा कमी झाल्या. यंदा भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. पण गटतटाच्या राजकारणात अडकल्याने भाजपला काही जागांचे नुकसान झाल्याचे निकालावरून दिसून येते.
अजित पवार गटाची राष्ट्रवादी १६ जागांसह निर्णायक भूमिकेत दिसत असली, तरी सत्तास्थापनेसाठी भाजपला पूर्णतः रोखण्याइतकी संख्या विरोधकांकडे नाही. काँग्रेसने १८ जागा जिंकून काही प्रमाणात ताकद दाखवली असली, तरी स्वतंत्रपणे नेतृत्व घेण्याइतका आकडा गाठता आला नाही. शरद पवार गटाची कामगिरी केवळ तीन जागांपुरती मर्यादित राहिल्याने विरोधी आघाडीतील संतुलन अधिकच ढासळले. या साऱ्या घडामोडीत शिंदेसेनेने दोन जागा जिंकत महापालिकेत चंचूप्रवेश केला.
भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने छुपा समझोता केला होता. भाजपविरोधात एकास एक लढतीचे गणित आखले होते. महाआघाडी व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने एकमेकांविरोधात उमेदवारही दिलेले नव्हते. यामागे भाजपचा रथ रोखण्याचीच खेळी होती. पण ही खेळी यशस्वी होऊ शकली नाही. उलट या खेळीचा तोटा मात्र महाआघाडीला विशेषतः राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला बसल्याचे दिसते.