Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपचे बहुमत एका जागेने हुकले, अनेक दिग्गजांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:52 IST2026-01-17T12:50:43+5:302026-01-17T12:52:38+5:30

महापालिकेत शिंदेसेनेची एन्ट्री

Sangli Municipal Election Results 2026 BJP misses majority by one seat in Sangli | Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपचे बहुमत एका जागेने हुकले, अनेक दिग्गजांचा पराभव

Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपचे बहुमत एका जागेने हुकले, अनेक दिग्गजांचा पराभव

सांगली : राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे बहुमत केवळ एका जागेने हुकले. या निवडणुकीत भाजपला ३९, काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) १६, राष्ट्रवादी (शरद पवार) ३, तर शिंदेसेनेला २ जागा मिळाल्या. धक्कादायक निकालाची परंपरा कायम राखत मतदारांनी अनेक दिग्गजांचा पराभव केला. यात भाजपचे शहर जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. अनेक प्रभागांत क्राॅस व्होटिंग झाल्याने चार सदस्यांच्या पॅनेलला धक्का बसला.

महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा एक टक्का कमी म्हणजे ६१.०३ टक्के मतदान झाल्याने मतदारांचा कौल कुणाला, याची उत्सुकता होती.

या निवडणुकीत भाजप महायुतीत फूट पडली. राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेसेनेने स्वतंत्र निवडणुका लढविल्या, तर काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने आघाडी करीत भाजपसमोर आव्हान उभे केले होते. आघाडीतील उद्धवसेना व मनसेही युती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभुराजे देसाई, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार डाॅ.विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्या सभांनी निवडणुकीचे रान तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्याही झडल्या होत्या.

वाचा : वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजी

शुक्रवारी सकाळी दहा वाजता मिरजेतील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी केंद्रावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. प्रभाग १, ३, ५, ९, १२, १५ या सहा प्रभागांची प्रथम मतमोजणी झाली. दोन फेऱ्यांत झालेल्या मतमोजणीत मतांचे आकडे कमी-जास्त होत होते. त्यामुळे उमेदवारांची धडधड वाढत चालली होती. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने इतर प्रभागाच्या मतमोजणी झाली. शेवटी प्रभाग १६ व १९ या दोन प्रभागांची मतमोजणी झाली.

गत निवडणुकीत भाजपने ४१ जागा जिंकून एकहाती सत्ता आणली होती, पण यंदा भाजपला दोन जागांचा फटका बसला. भाजपचा रथ ३९ जागांवर अडखळला. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीने भाजपला बालेकिल्ल्यात रोखले. प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने भाजपला धक्का दिला. या प्रभागात केवळ एकाच जागेवर भाजपला समाधान मानावे लागले, तर गावभागमधील प्रभाग १४ च्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपला एक जागा गमावावी लागली. त्यामुळे बहुमताचे स्वप्न भंगले.

काँग्रेसने १८ तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाही यंदा चांगले यश मिळाले असून, ते तिसऱ्या स्थानी राहिले. या पक्षाला १६ जागा मिळाल्या, तर शिंदेसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले. यंदा अनेक प्रभागात क्राॅस व्होटिंगही झाले. त्याचा फटका पक्षाच्या अधिकृत पॅनेलला बसला. प्रभाग १०, १४, १६, १७, १९ या प्रभागातील क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसला.

महापालिकेत शिंदेसेनेची एन्ट्री

महापालिकेच्या स्थापनेपासून शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत एन्ट्रीसाठी झगडावे लागले आहे. गेल्या पंधरा वर्षांत शिवसेनेचा एकही नगरसेवक सभागृहात नव्हता. यंदा मात्र, शिंदेसेनेने दोन जागा पटकावत पुन्हा महापालिकेत एन्ट्री घेतली आहे. शिंदेसेनेकडून प्रभाग एकमधून सागर व्हनखंडे आणि प्रभाग १४ मधून युवराज बावडेकर विजयी झाली. या दोघांनीही भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला.

पक्षीय बलाबल

  • भाजप - ३९
  • काँग्रेस - १८
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - १६
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - ३
  • शिंदेसेना - २

Web Title : सांगली चुनाव: भाजपा बहुमत से चूकी, दिग्गजों को मिली हार, नतीजे चौंकाने वाले।

Web Summary : सांगली नगर निगम चुनाव में भाजपा एक सीट से बहुमत से चूक गई। भाजपा ने 39, कांग्रेस ने 18, राकांपा (अजित पवार) ने 16, राकांपा (शरद पवार) ने 3 और शिंदे सेना ने 2 सीटें जीतीं। क्रॉस-वोटिंग के बीच भाजपा अधिकारियों समेत कई प्रमुख नेता हार गए।

Web Title : Sangli Election: BJP Misses Majority, Key Leaders Lose in Shocking Results.

Web Summary : In Sangli Municipal elections, BJP missed a majority by one seat. BJP won 39, Congress 18, NCP (Ajit Pawar) 16, NCP (Sharad Pawar) 3, and Shinde Sena 2. Many prominent leaders, including BJP officials, were defeated amid cross-voting.