शेगाव (ता. जत) जवळ २ कोटी ३३ लाख रुपयांचा दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 14:03 IST2021-01-15T14:00:01+5:302021-01-15T14:03:55+5:30
Crimenews Sangli- जत ते सांगोला रोडवरुन सोने विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या ज्वेलरी व्यावसाईकाच्या डोळ्यात चटणी टाकून चार अज्ञात दरोडेखोरानी सुमारे २ कोटी ३३ लाख रूपये किमतीचे ४ किलो ६०० ग्राम सोन्याची बिस्किटे हातोहात लंपास केली .

शेगाव (ता. जत) जवळ २ कोटी ३३ लाख रुपयांचा दरोडा
जत ः जत ते सांगोला रोडवरुन सोने विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या ज्वेलरी व्यावसाईकाच्या डोळ्यात चटणी टाकून चार अज्ञात दरोडेखोरानी सुमारे २ कोटी ३३ लाख रूपये किमतीचे ४ किलो ६०० ग्राम सोन्याची बिस्किटे हातोहात लंपास केली .
ही घटना गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान जत शहरापासून दोन किलोमीटर आंतरावरील माळी वस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी बाळासाहेब वसंत सावंत (वय ३५, रा.पळसखेल, ता.आटपाडी, जि.सांगली) यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे जत तालुक्यातील सराफ व्यावसाईकात खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,बाळासाहेब सावंत हे अन्य एकजण सहकारी घेवुन गुरूवारी सायंकाळी बेळगांव (कर्नाटक) येथून २४ कँरेट सोन्याची बिस्किटे कापडी बँगेत भरून घेवून चारचाकी युनोव्हा गाडीतून शेगांव ता.जत येथील सराफ व्यापारी संजय नलवडे याना देण्यासाठी येत होते.
दरम्यान माळी वस्तीनजिक रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून लघुशंकेसाठी ते दोघेजण थांबले होते. त्यांच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या ओमनी गाडीतून तोंडावर कापड बांधून आलेल्या अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील चार संशयित दरोडेखोरानी अचानक सावंत व सहकाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.
यावेळी त्यांनी आरडाओरडा करून रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या वाहनाना हाथ दाखवून थांबण्याची विनंती केली. तोपर्यंत गाडीतील २ कोटी ३३ लाख १३ हजार ५०० रूपये किमतीचे सोने घेऊन जत शहराच्या दिशेने त्यांनी पलायन केले आहे. जाताना दरोडेखोरानी दोघांचे मोबाईल फोन हिसकावून नेले आहेत.
घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले याना समजल्यानंतर त्यांनी नाकाबंदी कडक करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम जाधव , सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहीते , पोलीस हावलदार बजरंग थोरात , उमर फकीर यांच्या समवेत तत्काळ घटनास्थळी भेट देवून दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगाव व आटपाडी येथे पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.