सांगली महापालिकेत २७ वर्षांत केवळ चार महिला महापौर, यंदा महापौरपदाच्या आरक्षणाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:25 IST2025-12-26T19:24:15+5:302025-12-26T19:25:26+5:30
शहरात पुरुषांपेक्षा महिला मतदारसंख्या अधिक : भाजप व काँग्रेसकडून दोघींना संधी

सांगली महापालिकेत २७ वर्षांत केवळ चार महिला महापौर, यंदा महापौरपदाच्या आरक्षणाकडे लक्ष
सांगली : महापालिका क्षेत्रात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असतानाही आतापर्यंत केवळ चार महिलांना प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला आहे. यंदा महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे आगामी महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन नगरपालिकांची मिळून १९९८ मध्ये महापालिका स्थापन करण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपद एक वर्षासाठी ओबीसी महिला राखीव होते. तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी महापौरपदी शैलजा नवलाई यांना संधी दिली. त्या महापालिकेच्या पहिल्या महापौर ठरल्या. त्यानंतर महापौरपदावर महिलांना संधी मिळण्यासाठी १४ वर्षे वाट पाहावी लागली.
२०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. यावेळी महापौरपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव होते. या पदावर पुरुष उमेदवारांची निवड न करता कांचन कांबळे यांना महापौरपदाची संधी देण्यात आली. त्यानंतर २०१८ च्या निवडणुकीत भाजपने महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. पहिली अडीच वर्षे ओबीसी महिलांसाठी महापौरपद आरक्षित होते. या काळात भाजपने संगीता खोत व गीता सुतार या दोन नगरसेविकांना महापौरपदाची संधी दिली.
सध्या महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी ४ लाख ५४ हजार मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदार २ लाख २३ हजार ३८३, तर महिला मतदार २ लाख २९ हजार ८३५ इतकी आहे. पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या पाच हजारांनी जास्त आहे. तरीही गेल्या २७ वर्षांत केवळ चारच महिलांना महापौरपदाची संधी मिळाली आहे.
महापौरपदाच्या आरक्षणाकडे लक्ष
महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याअगोदर महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी नगरसेवक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना महापौर पदाच्या आरक्षणाबाबत उत्सुकता राहणार आहे. दरम्यान, येत्या आठवड्याभरात महापौरपदाचेही आरक्षण सोडत जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकाच महिलेला स्थायीचे सभापतीपद
महापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीकडे असतात. त्यामुळे स्थायी समितीत वर्णी लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत मोठी चुरस असते. स्थायी समिती सदस्यपदी आतापर्यंत अनेक महिलांना संधी मिळाली आहे. पण, सभापतीपद मात्र महापालिकेच्या इतिहासात केवळ एकाच महिलेला मिळाले आहे. महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या संगीता हारगे या सभापतीपदी निवडून आल्या होत्या.
आतापर्यंतचे महापौर
१. शैलजा नवलाई, २. सुरेश पाटील, ३. लतिफ कुरणे, ४. विजय धुळबुळ, ५. किशोर शहा, ६. किशोर जामदार, ७. मैनुद्दीन बागवान, ८. नितीन सावगावे, ९. इद्रीस नायकवडी, कांचन कांबळे, ११. विवेक कांबळे, १२. हारुण शिकलगार, १३. संगीता खोत, १४. गीता सुतार, १५. दिग्विजय सूर्यवंशी.