Sangli: मिरजेतील शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, जुन्या यंत्रांची भंगारात तीन कोटींना विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:04 IST2025-07-15T18:04:01+5:302025-07-15T18:04:31+5:30
५५ एकर जागेवर अनेकांचे लक्ष

Sangli: मिरजेतील शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, जुन्या यंत्रांची भंगारात तीन कोटींना विक्री
सदानंद औंधे
मिरज : मिरज येथील शासकीय दूध डेअरीमधील जुन्या दूध प्रक्रिया यंत्रणेची २ कोटी ८४ लाख रुपयांना भंगारात विक्री करण्यात आली आहे. बंद असलेली शासकीय दूध योजना पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग होणार असल्याने मिरजची शासकीय दूध डेअरी आता इतिहास ठरणार आहे.
मुंबईनंतर राज्यातील सर्वांत मोठी असलेली मिरज येथील शासकीय डेअरी गेल्या पंधरा वर्षांपासून बंद आहे. वर्ष १८५७ मध्ये स्थापन झालेल्या मिरजच्या शासकीय दूध डेअरीत सुमारे दोन लाख लिटर दूध प्रक्रिया करण्याची क्षमता होती. मात्र, कालबाह्य झालेल्या या यंत्रणेचा लिलाव केला असून, २ कोटी ८४ लाख रुपयांत या जुन्या साहित्याची सांगलीतील विशाल स्टील या भंगार व्यावसायिकाला भंगारात विक्री झाली आहे. लिलाव झालेली जुनी यंत्रणा तोडून नेण्याचे काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यात दररोज १५ लाख लिटर दूध उत्पादन होते.
मात्र, खासगी आणि सहकारी संस्थांच्या स्पर्धेत टिकू न शकल्यामुळे शासकीय दूध डेअरीचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. डेअरीतील भंगार साहित्य विक्री झाल्यामुळे आता डेअरीची जुनी इमारत व सुमारे ५५ एकर जागा शिल्लक आहे. अनेक वर्षे बंद असल्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. मिरजसह राज्यातील शासकीय दूध योजना बंद अवस्थेत असल्याने या दूध योजना शिल्लक कर्मचाऱ्यांसह पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. आता मिरजची शासकीय दूध योजना इतिहासजमा ठरण्याच्या मार्गावर आहे.
वॅगनमधून दूध पुरवठा
मिरज येथील शासकीय दूध डेअरीतून एकेकाळी रेल्वे वॅगनमधून मुंबईला दूध पाठविला जात होता. यासाठी डेअरीपर्यंत रेल्वे रूळ होते. काही काळ मराठवाड्यातील अतिरिक्त दूधही येथे येत होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातून येणारा दूध पुरवठा थांबल्यामुळे शासकीय दूध डेअरीचे कामकाज पूर्णपणे बंद झाले आहे.
फक्त ३० कर्मचारी
डेअरीतील एकूण ५०० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना इतरत्र पाठवण्यात आले आहे. आता फक्त ३० कर्मचारी शिल्लक आहेत. दूध योजनेतील कर्मचाऱ्यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे जाण्याचे पर्यायही दिले आहेत.
५५ एकर जागेवर अनेकांचे लक्ष
मिरज शहरातील शासकीय दूध डेअरीची सुमारे ५५ एकर जागा अनेकांच्या मनात आहे. मात्र, डेअरी बंद झाल्यामुळे या जागेचा शासकीय कार्यालयासाठी वापर करण्याचा प्रस्ताव असू शकतो.