Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:06 IST2022-06-13T13:04:49+5:302022-06-13T13:06:19+5:30
मृत प्रभू याने सुनील यास ‘भाचीसोबत लग्न लावून न दिल्यास दोघेही आत्महत्या करू’ अशी धमकी दिली होती.

Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून
मिरज : गुंडेवाडी (ता. मिरज) येथे दोन दिवसांपूर्वी लाकडी दांडक्याने डोक्यात हल्ला केल्याने जखमी झालेल्या प्रभू पाेपट सूर्यवंशी (वय २२, रा. लंगरपेठ, ता. कवठेमहांकाळ) या तरुणाचा उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे (रा. लंगरपेठ) याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाचीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे मामा सुनील शिंदे याने प्रभू सूर्यवंशी याचा खून केल्याचे समाेर आले आहे.
मूळचा लंगरपेठ येथील सुनील शिंदे हा मिरजेत इंदिरानगर येथे बहिणीकडे राहत होता. मृत प्रभू हा सुनील याचा नातेवाइक आहे. सुनील याच्या मिरजेतील मेहुण्याच्या हाॅटेलात तो काम करीत होता. यादरम्यान त्याचे सुनील याच्या भाचीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. मृत प्रभू याने सुनील यास ‘भाचीसोबत लग्न लावून न दिल्यास दोघेही आत्महत्या करू’ अशी धमकी दिली होती. मात्र या लग्नास विरोध असल्याने सुनील याने प्रभू यास ‘तू गावी चल आणि तेथे गळफास लावून घे’ असे सांगितले.
यानंतर प्रभू व त्याचा नातेवाइक ज्ञानदेव अरविंद सूर्यवंशी व सुनील शिंदे हे तिघे शुक्रवारी दुपारी मिरजेतून लंगरपेठला दुचाकीवरून (एमएच १० ओएस १२३३) जात हाेते. तिघेजण गुंडेवाडीत पोहोचले असता तेथे सुनील यास भाचीने घरात गळफास लावून घेतल्याचा बहिणीचा फोन आला. यामुळे रागाच्या भरात सुनील याने ‘तुझ्यामुळे माझ्या भाचीने गळफास लावून घेतला. तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत रस्त्यावर पडलेल्या लाकडी दांडक्याने प्रभूच्या डोक्यात हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने प्रभूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत ज्ञानदेव सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून सुनील ऊर्फ सोन्या शिवाजी शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली.