संजयकाका खासदार कोणत्या पक्षाचे?, तालुकाध्यक्षांचा सवाल; जतमध्ये भाजपअंतर्गत वाद पेटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:37 IST2022-12-29T15:36:40+5:302022-12-29T15:37:11+5:30
जत तालुक्यातील भाजपची पाळेमुळे रोखण्याचे काम खासदार संजयकाका पाटील करीत आहेत

संजयकाका खासदार कोणत्या पक्षाचे?, तालुकाध्यक्षांचा सवाल; जतमध्ये भाजपअंतर्गत वाद पेटला
जत : जत तालुक्यातील भाजपची पाळेमुळे रोखण्याचे काम खासदार संजयकाका पाटील करीत आहेत. ते भाजपचे खासदार आहेत की काँग्रेस, राष्ट्रवादीचे, असा सवाल भाजपचे जत तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. दोन दिवसांपासून जतमध्ये भाजपअंतर्गत राजकारण पेटले आहे.
पत्रकात सावंत यांनी म्हटले आहे की, बीट हवालदारांची मदत घेऊन मागील विधानसभेला खासदारांनी जगताप यांना पराभूत करण्याचे पाप केले. आताही त्यांचे तेच उद्योग सुरू आहेत. पण, असले धंदे भाजप कार्यकर्ते चालू देणार नाहीत. २० डिसेंबरला खासदार संजयकाका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थित झाले. पाटील हे भाजपचे खासदार आहेत की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे, अशी शंका निर्माण झाली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपशी बेइमानी केलेल्या सर्व बीट हवालदारांची फौज संजयकाका पाटील घेऊन कार्यक्रम करत फिरत आहेत. आमचे नेते विलासराव जगताप यांनी खासदारकीच्या दोन्ही निवडणुकांत तिकिटापासून प्रचारापर्यंत त्यांचा प्रचार केला. कोणत्याही पक्षाशी निष्ठा नसलेल्या सत्तापिपासू माणसांना व राष्ट्रवादीची टीम घेऊन संजयकाकांनी जत तालुक्यातील भाजपची पाळेमुळे रोखण्याचे काम सुरू केले आहे.
फितुरांची टीम बरोबर घेऊन निवडणुका आल्याचे सांगत जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याचे त्यांचे नाटक आहे. पक्षाला विरोध करणारे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपशब्द बोलणाऱ्या लोकांना घेऊन खासदार फिरत आहेत. जिल्हा भाजपच्या नेत्यांनी याची नोंद घ्यावी, अशी आमची मागणी आहे.
वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार
खासदार पाटील यांनी केलेल्या पक्षाच्या विरोधातील गोष्टी व अन्य बाबींसंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे तक्रार करणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी पत्रकात म्हटले आहे.