सांगलीत पोलिस गाड्यांवरील कॅमेऱ्यातून मिरवणुकांवर नजर - पोलिस अधीक्षक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:04 IST2025-08-21T18:03:18+5:302025-08-21T18:04:24+5:30

स्टेज मारून रस्ता अडवल्यास कारवाई

Monitor processions through cameras on police vehicles says Sangli Superintendent of Police | सांगलीत पोलिस गाड्यांवरील कॅमेऱ्यातून मिरवणुकांवर नजर - पोलिस अधीक्षक 

सांगलीत पोलिस गाड्यांवरील कॅमेऱ्यातून मिरवणुकांवर नजर - पोलिस अधीक्षक 

सांगली : उत्सव काळात पोलिस प्रशासनाच्या सर्व गाड्यांवर कॅमेरे बसवण्यात येतील. गर्दीच्या ठिकाणी या वाहनातून मिरवणूक मार्गावर तसेच मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणीही कायदा मोडताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल होतील असा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे.

आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद निमित्त पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागातील गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, पोलिस मित्र, मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित नागरिक आदींची बैठक सोमवारी सायंकाळी फल्ले मंगल कार्यालय सांगलीवाडी येथे झाली. अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक विमला एम. यांची प्रमुख उपस्थिती होती.

अधीक्षक घुगे म्हणाले, गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. पोलिस, महापालिका व सर्व शासकीय प्रशासन पूर्ण तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. ‘नॉईज मीटर’ द्वारे नोंदणी केली जाईल. रस्त्यावर कोणत्याही मंडळाने स्टेज घालून रस्ता अडवू नये.

यंदा पोलिसांच्या गाड्यांवरील कॅमेऱ्यातून मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाईल. मिरवणूक मार्गामध्ये कोणीही बदल करू नये. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्रित आले आहेत. सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी एक चांगली संधी आहे. उत्सव काळात पोलिस कंट्रोल विभाग २४ तास सक्षम असेल. कोणीही संपर्क साधल्यास तत्काळ मदत पोहोचवण्यात येईल. घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंडाचा वापर करावा.

उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माधुरी वसगडेकर, सनाउल्ला बावस्कर, मोसिन शेख, अक्रम शेख, अजित सूर्यवंशी, उदय मुळे, दीपक चव्हाण, असिफ बाबा यांनी अडीअडचणी सांगितल्या.

एक खिडकी कार्यान्वित

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे म्हणाले, महापालिकेत एक खिडकी कार्यान्वित केली आहे. सर्व परवानगी एकत्रित देण्याचे काम चालू आहे. महापालिका, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण व इतर परवानगी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा.

बैठकीत आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, तेजस शहा, वाहतूक शाखा निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, संजयनगरचे निरीक्षक सुरज बिजली, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक भैरू तळेकर, सहायक निरीक्षक प्रफुल्ल कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Monitor processions through cameras on police vehicles says Sangli Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.