मिरज पोलिसांना हवीय बाळाची अन् मातेची डीएनए टेस्ट, पळवलेल्या संशयित महिलेला दोन दिवस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:38 IST2025-05-07T19:37:45+5:302025-05-07T19:38:04+5:30
मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून बाळ चोरून नेणाऱ्या सारा साहेबा साठे या महिलेस न्यायालयाने ८ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली ...

मिरज पोलिसांना हवीय बाळाची अन् मातेची डीएनए टेस्ट, पळवलेल्या संशयित महिलेला दोन दिवस कोठडी
मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून बाळ चोरून नेणाऱ्या सारा साहेबा साठे या महिलेस न्यायालयाने ८ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सारा हिच्याकडून ताब्यात घेतलेले बाळ कविता आलदर यांचेच आहे, हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी बाळाची डीएनए चाचणी करण्याची शिफारस केली आहे.
मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून शनिवारी दुपारी तीन दिवसांचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेल्याने खळबळ उडाली होती. कोळे, ता. सांगोला येथील कविता समाधान आलदर या प्रसूत महिलेच्या नवजात अर्भकास सारा साठे या महिलेने पळवून नेले. सिव्हिलमधून चोरीस गेलेल्या बाळाला गांधी चौक पोलिसांनी ५६ तासांत शोधून काढले. बाळ चोरणारी महिला व नवजात बालकास सावळज (ता. तासगाव) येथून ताब्यात घेण्यात आले.
सारा हिला मूल नसल्याने तिने अर्भक चोरल्याची कबुली दिली आहे. मात्र नवजात अर्भकाची तस्करी अथवा अन्य कारणासाठी हा प्रकार घडला आहे काय, याची पोलिस चौकशी करीत आहेत. सारा साठेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाच्या तपासासाठी मिरज न्यायालयाने तिला दोन दिवस पोलिस कोठडी दिली.
साठे हिच्याकडून ताब्यात घेतलेले बाळ कविता आलदर यांचेच आहे हे निश्चित करण्यासाठी बाळाची डीएनए तपासणी करण्यात येणार असल्याचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सांगितले.
चौकशी अहवाल आज सादर होणार
या प्रकरणाच्या चौकशीसाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्य समितीचा अहवाल बुधवारी सादर होणार असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांनी सांगितले.
काय असते डीएनए चाचणी
डीएनए म्हणजे डीऑक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड. यात रक्ताचा किंवा स्त्रावचा नमुना घेतला जातो. या चाचणीद्वारे बाळ कोणाचे आहे हे निश्चित केले जाते. यात बाळ, आई आणि वडिलांच्या डीएनएची तुलना केली जाते.