Sangli Municipal Election 2026: सांगलीत बंडखोरांच्या मनधरणीने नववर्ष सुरु, भाजपमध्ये सर्वाधिक बंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:52 IST2026-01-01T13:51:29+5:302026-01-01T13:52:12+5:30
बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रचार शुभारंभ

Sangli Municipal Election 2026: सांगलीत बंडखोरांच्या मनधरणीने नववर्ष सुरु, भाजपमध्ये सर्वाधिक बंड
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा विक्रमी १ हजार ६२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीही सर्वाधिक झाली आहे. नव्या वर्षाची सुरुवात आता सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांना बंडखोरांच्या मनधरणीने करावी लागणार आहे. भाजपच्या दोन्ही आमदारांसह कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला कितपत यश येते हे अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल.
महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चितीवरून सर्वच पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागली होती. भाजपकडे ५७० जणांनी उमेदवारी मागितली होती. त्यात नेत्यांमधील संघर्षामुळे तिकीट वाटपाचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत लांबला होता. दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीचे घोंगडेही शेवटपर्यंत भिजत होते. अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) यांची आघाडी झाली. भाजप, उद्धवसेना, शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. त्यामुळे यंदा विक्रमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडून नाराजांना रोखण्यासाठी बुधवारपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाच्या दोन आमदारांसह कोअर कमिटीचे पदाधिकारी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, बंडखोरी थोपविण्यात किती यश येणार, हे शुक्रवारी दुपारी समजणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी २ जानेवारी अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर नाराजांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मकरंद देशपांडे आदींसह संघटनात्मक पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. काही ठिकाणी थेट भेटीगाठी, चर्चा, तर काही ठिकाणी भविष्यातील जबाबदाऱ्या आणि पक्षातील भूमिका देण्याचे आश्वासन देऊन बंडखोरांना माघारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष शिस्तीचा इशाराही काही ठिकाणी दिला जात आहे. बंडखोर उमेदवार अर्ज माघार घेतात की निवडणुकीत थेट आव्हान देतात, यावर महापालिकेच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
नेत्यांसोबत उमेदवारही जाणार
भाजपमध्ये नाराजी उफाळून आल्यानंतर बंडखोरांना रोखण्याबाबत चर्चा करण्यासाठी विश्रामबाग येथील एका मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली. नाराजांची समजूत काढण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करणार आहेत. मात्र, ज्याठिकाणी बंडखोरी झाली आहे, तिथे कार्यकर्त्यांशी नेतेमंडळी चर्चा करणार आहेत. नाराजांच्या मनधरणीसाठी आता पक्षाचे अधिकृत उमेदवारही जाणार आहेत. सर्वांनी एकत्र बसून समजूत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रचाराचा नियोजन करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. नितीन शिंदे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, जयश्रीताई पाटील, नीता केळकर, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रचार शुभारंभ
भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३ जानेवारी रोजी होणार आहे. महापालिका निवडणूक प्रचार यंत्रणा आणि प्रचाराची चर्चा करण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत निवडणुकीसाठीची रणनीती, प्रचाराची दिशा, संघटनात्मक बांधणी व जनतेशी थेट संवाद याबाबत चर्चा करत उमेदवारांशी संवाद साधला.