Maratha reservation: मोडी लिपीतील कुणबी पुरावे मिळणार एकाच छताखाली, सांगली जिल्ह्यातील शिराळा तहसीलमध्ये प्रणाली विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:13 IST2025-09-22T15:12:47+5:302025-09-22T15:13:17+5:30

नागरिकांना होणारा त्रास आणि आर्थिक भुर्दंड आता थांबणार

Kunbi evidence in Modi script will be available at one place, system developed in Shirala Tehsil of Sangli district | Maratha reservation: मोडी लिपीतील कुणबी पुरावे मिळणार एकाच छताखाली, सांगली जिल्ह्यातील शिराळा तहसीलमध्ये प्रणाली विकसित

Maratha reservation: मोडी लिपीतील कुणबी पुरावे मिळणार एकाच छताखाली, सांगली जिल्ह्यातील शिराळा तहसीलमध्ये प्रणाली विकसित

विकास शहा

शिराळा : कुणबी दाखल्यासाठी मोडी लिपीतील जुने पुरावे शोधणे, ते वाचण्यासाठी तज्ज्ञ शोधणे, त्याचे मराठीत भाषांतर करून प्रतिज्ञापत्र सादर करणे, या सर्व किचकट प्रक्रियेमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि आर्थिक भुर्दंड आता थांबणार आहे. शिराळा तहसीलदार शामला खोत-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अभिनव उपक्रम राबवत राज्यात प्रथमच एक अशी प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे नागरिकांना आता कोणताही त्रास न होता मोडी लिपीतील पुरावे सहज उपलब्ध होत आहेत.

कुणबी दाखल्यासाठी नागरिकांना त्यांच्या पूर्वजांच्या मोडी लिपीतील नोंदी शोधून काढाव्या लागत होत्या. या नोंदी वाचण्यासाठी मोडी लिपी वाचणाऱ्या तज्ज्ञांची मदत घ्यावी लागत असे. त्यानंतर त्याचे मराठी भाषांतर करून प्रतिज्ञापत्र तयार करावे लागत होते. या सर्व प्रक्रियेत वेळ आणि पैसा खर्च होत होता, शिवाय नागरिकांची प्रचंड धावपळ होत होती.

नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, नायब तहसीलदार अस्लम जमादार, महसूल सहायक संजय देवकर, दीपक चव्हाण, राजू आगळे ,रोशन कांबळे, गौरी पाटील व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने तालुक्यातील सर्व जुन्या मोडी लिपीतील नोंदी एकत्र केल्या. या सर्व नोंदींचे गाववार वर्गीकरण करून त्याचे १८ सुसज्ज रजिस्टर तयार करण्यात आले. 

या प्रत्येक रजिस्टरवर गावाचे नाव, आतमध्ये अनुक्रमणिका, पान क्रमांक, नोंदीचा क्रमांक, संबंधित व्यक्तीचा जन्म-मृत्यू तारीख आणि जातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रत्येक नोंदीखाली मोडी लिपी वाचणाऱ्या तज्ज्ञाची सही आहे आणि मागे मूळ मोडी लिपीतील पुराव्याची प्रत जोडलेली आहे. आता ज्या नागरिकाला आपल्या पूर्वजांच्या कुणबी नोंदीचा पुरावा हवा असेल, त्याला फक्त तहसील कार्यालयात येऊन या रजिस्टरमधून आपल्या गावाच्या नोंदीची अधिकृत प्रत घ्यायची आहे.

या प्रतीसोबत मूळ मोडी पुरावा जोडलेला असल्याने वेगळे भाषांतर, वाचन किंवा प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अजिबात गरज नाही. हा एकच पुरावा सर्वत्र ग्राह्य धरला जाणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचले असून, राज्यात अशा प्रकारची सुविधा देणारे शिराळा हे पहिलेच तहसील कार्यालय ठरले आहे.

कामाची आकडेवारी

  • आतापर्यंत ५४४ मोडी लिपीतील पुस्तके तपासली.११,१०१ नोंदींमधून ८,५८३ कुणबी नोंदी सापडल्या.
  • २३७ मराठी पुस्तकांतील ११,३५५ नोंदी तपासल्या, त्यातून ४,८५२ कुणबी नोंदी मिळाल्या.
  • एकूण १३,४३५ कुणबी नोंदी आतापर्यंत यशस्वीरित्या शोधल्या आहेत.

"नागरिकांना मोडी लिपीतील कुणबी नोंदीचा दाखला मिळवण्यासाठी होणारी धावपळ आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आम्ही गावपातळीवर हे रजिस्टर तयार केले आहेत. याचा नागरिकांना खूप मोठा फायदा होत आहे." - शामला खोत-पाटील, तहसीलदार, शिराळा

Web Title: Kunbi evidence in Modi script will be available at one place, system developed in Shirala Tehsil of Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.