हाय प्रोफाईल कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील आले अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:57 IST2019-05-27T14:56:18+5:302019-05-27T14:57:52+5:30
इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.

हाय प्रोफाईल कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील आले अडचणीत
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.
जयंत पाटील यांनी इस्लामपूर, आष्टा या शहरांच्या विकासाला गती दिली. ग्रामीण भागातील विकासाला निधी कमी पडू दिला नाही. त्याचबरोबर राजारामबापू उद्योग समूहातील संस्था सक्षम केल्या. या ठिकाणी नोकऱ्या देताना सर्वसामान्य बेरोजगारांचा विचार केला नाही. ज्याचा इस्लामपूर मतदारसंघाशी काहीही संबंध नाही, अशांना अधिकारी पदावर संधी दिली. या अधिकाऱ्यांनी आर्थिक स्वार्थ साधला.
याचाही परिणाम झाल्याचे दिसत आहे.गेल्या चार वर्षात भाजपच्या धोरणांविरोधात जयंत पाटील यांनी आंदोलने केली. इस्लामपूर शहरात आंदोलनावेळी हाय प्रोफाईल पदाधिकारी, कार्यकर्ते आलिशान वाहनांतून येऊन तोंडओळख परेड करण्यापलीकडे त्यांची कार्यपद्धती कधी पुढे सरकली नाही. तसेच काही नेते मतदार संघात आमदार पाटील यांच्या दौऱ्यावेळीच दिसतात. या नेत्यांना त्यांच्या गावातही जनमत नाही. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांची फळी आ. पाटील यांच्यापासून दुरावत चालली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात पक्ष बांधणीसाठी संपर्क वाढविला आहे. त्याचबरोबर इस्लामपूर मतदार संघावरही आपले लक्ष केंद्रित केले आहे. गावा-गावातील बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी बैठका घेण्यावरही आ. पाटील यांनी भर दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना वाळवा-शिराळ्यात मताधिक्य मिळाले. जोपर्यंत जयंत पाटील यांच्याजवळचे हाय प्रोफाईल कार्यकर्ते जनमानसात मिसळत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादीची ताकद वाढणार नाही, हे मात्र स्पष्टपणे दिसत आहे.