हिंदू राष्ट्रामध्ये प्रथम हिंदूंचे हित जपले जावे; सर्वधर्म समभावाचा जप करणार नाही - नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:50 IST2024-08-30T16:49:06+5:302024-08-30T16:50:24+5:30
शहरवासीयांनी इस्लामपूर म्हणायचे बंद करत ‘ईश्वरपूर’ असेच म्हणावे

हिंदू राष्ट्रामध्ये प्रथम हिंदूंचे हित जपले जावे; सर्वधर्म समभावाचा जप करणार नाही - नितेश राणे
इस्लामपूर : ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू भगिनींना फसवले जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंना मारले जात आहे. हिंदूंची संख्या कमी करण्याचे षडयंत्र आहे. अशा वेळी आम्ही सर्वधर्म समभावाचा जप करणार नाही. हिंदू राष्ट्रात पहिल्यांदा हिंदूंचे हित पाहिले जाईल, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.
इस्लामपूर येथे गुरुवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने शिवाजी चौकातून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर यल्लमा चौकात जाहीर सभा झाली. यावेळी नितेश राणे बोलत होते. भरत आदमापुरे व हर्षाताई ठाकूर यांची उपस्थिती होती.
राणे म्हणाले, भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानले जाईल. पोलिसांनी ईद, मोहरमला मुस्लिमांचे लाड पुरवू नयेत. त्यांचे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत आणि आमच्या गणेशोत्सव, नवरात्रीच्या मिरवणुका दहा वाजेपर्यंत चालतात. पोलिसांनी हिंदू बांधवांवर अन्याय करू नये. अन्यथा २४ तासांत खुर्ची ठेवणार नाही. आम्ही कायद्याचे पालन मर्यादेपर्यंत करू, त्यानंतर शस्त्रसुद्धा उचलू.
भरत आदमापुरे म्हणाले, भारतात हिंदूंवर अन्याय होतो. बांगलादेशला हिंदूमुक्त राष्ट्र करायचे आहे. काँग्रेस पक्ष मुस्लीम लीगच्या मार्गावर चालला आहे.
हर्षाताई ठाकूर म्हणाल्या, जिहाद्यांना फाशी द्या किंवा त्यांचा एन्काउंटर करावा. सांगली जिल्ह्यातील अनेक भगिनी लव्ह जिहादमध्ये बळी पडल्या आहेत.
लवकरच ईश्वरपूरचा अध्यादेश..
शहरवासीयांनी इस्लामपूर म्हणायचे बंद करत ‘ईश्वरपूर’ असेच म्हणावे. डॉ. हेडगेवार व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘ईश्वरपूर’ असे नाव दिलेच आहे. शासन स्तरावर त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ईश्वरपूरच्या नावाचा अध्यादेश निघेल. शहरातील बेकायदेशीर मशीद, मदरसे ठेवू नका अन्यथा हिंदूंना ते काम हातात घ्यावे लागेल, असा इशारा राणे यांनी दिला.