गद्दारी कराल तर परिणाम भोगाल, भाजपच्या नूतन नगरसेवकांना चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:44 IST2026-01-27T16:43:26+5:302026-01-27T16:44:08+5:30

केंद्रीय नेतृत्वाला फसवले तर काय होते, हे महाराष्ट्र उदाहरण आहे

If you commit treason you will suffer the consequences Chandrakant Patil warns new BJP corporators | गद्दारी कराल तर परिणाम भोगाल, भाजपच्या नूतन नगरसेवकांना चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा

गद्दारी कराल तर परिणाम भोगाल, भाजपच्या नूतन नगरसेवकांना चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा

सांगली : गतवेळी भाजपकडे बहुमत असतानाही काहीजणांनी गद्दारी केली, म्हणून पक्षाचा महापौर होऊ शकला नाही. यंदा महापालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. पक्ष खूप प्रेम करते म्हणून कसेही वागून चालणार नाही. माझ्यापासून पक्षाचे नुकसान होणार नाही, याबाबतची दक्षता घ्या. गद्दारी कराल तर त्याचे परिणाम भोगावे लागेल. त्याचे महाराष्ट्र हे उदाहरण आहे, असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नूतन नगरसेवकांना जणूकाही इशाराच दिला.

महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन नगरसेवक व पराभूत उमेदवारांचा मेळावा सांगलीतील एका मंगल कार्यालयात झाला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, बाळासाहेब यादव, विश्वजित पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, देशामध्ये २२ राज्यांमध्ये मुख्यमंत्री असणारा भाजप एकमेव पक्ष आहे. पक्षाने सारे काही देऊनही काहीजण गद्दारी करतात, तेव्हा त्रास होतो. मी धमकी देत नाही, तुम्हाला सावध करीत आहे. केंद्रीय नेतृत्वाला फसवले तर काय होते, हे महाराष्ट्र उदाहरण आहे. काही दिवसांत त्याचे परिणाम भोगावे लागतात. पक्ष खूप प्रेम करते म्हणून आपण कसेही वागून चालणार नाही. महापलिकेत नगरसेवक म्हणून कमिशन मिळवण्याची पतपेढी नव्हे. पद दिले म्हणून काहीही चालणार नाही. जुन्या आठवणी उगळून काढणार नाही. गतवेळी ४३ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सात नगरसेवक फुटल्याने सत्ता गमवावी लागली होती. आता गद्दारी खपवून घेणार नाही.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, केवळ पाणी, गटर, रस्ते तितकंच आपलं काम नाही तर आपल्या शहराची, शहराच्या विकासाचे व्हिजन हे आपल्याकडे असले पाहिजे. त्यासाठी आपण खूप अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, नेटवर बसलं पाहिजे. जगातली शहर ही कशी आहेत, त्यांनी काय केलं असा अभ्यास करून तेथील प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्री, आमदारांकडे आग्रह धरला पाहिजे. यावेळी आ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनीही मार्गदर्शन केले. संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.

माणसांचा विकास करणारे उपक्रम राबवा

नगरसेवक म्हणून रस्ते, गटारी आदी नागरी समस्या सोडवायच्या आहेतच, पण केवळ तेच काम नाही. माणसांचा विकास करणारे उपक्रम हाती घेतले पाहिजे. शहराचे विकासाचे व्हिजन हवे. शासनाच्या निधीसह तुम्हाला सीएसआर फंडातून निधी मिळवून देऊ, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: If you commit treason you will suffer the consequences Chandrakant Patil warns new BJP corporators