Sangli: मिरजेत बालिका दगावल्याने रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:20 IST2025-01-04T12:19:58+5:302025-01-04T12:20:25+5:30
हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

Sangli: मिरजेत बालिका दगावल्याने रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल
मिरज : मिरजेत रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी बालरुग्णालयाची तोडफोड करीत ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश आमणापुरे यांना मारहाण केली. या तोडफोडीत वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाले. याबाबत गांधी चौक पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा मिरज ‘आयएमए’कडून निषेध केला आहे.
मिरजेत गुरुवारी रात्री ११ वाजता बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश अमणापुरे यांच्या अल्फा हॉटेलजवळील स्वप्निल बाल रुग्णालयात मुस्तफा शेख (रा. शामरावनगर, सांगली) यांच्या १३ महिन्यांच्या अत्यवस्थ लहान मुलीला उपचारासाठी आणले होते. मात्र उपचारापूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला. यामुळे डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मुस्तफा शेख व त्यांच्यासोबत असलेल्या सहा नातेवाईकांनी रुग्णालयातील फर्निचर व वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली.
डॉ. प्रकाश अमणापुरे यांना मारहाण व शिवीगाळ केली. यामुळे रुग्णालयांतील वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे लाखोचे नुकसान झाले. तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. रुग्णालयात आणलेल्या रुग्ण बालिकेची तपासणी व उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तरीही नातेवाईकांनी तोडफोड व मारहाण केल्याचे डॉ. प्रकाश अमणापुरे यांनी सांगितले. या घटनेचा निषेध करून मिरज आयएमएच्या सदस्यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली.
याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात मुस्तफा शेख व अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्लेखोरांवर कारवाईची मागणी
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्थांमध्ये हिंसक कृत्य, मालमत्तेची हानी व नुकसानीस प्रतिबंध अधिनियमानुसार हल्लेखोरांवर कारवाईची मागणी मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील यांनी केली.