Sangli: शेतकरी म्हणाले, साहेब ‘शक्तिपीठ’ आम्हाला नकोच; दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:12 IST2025-04-22T20:11:08+5:302025-04-22T20:12:30+5:30

पहिल्या दिवशी वज्रचैंडे, पद्माळे, माधवनगर, सावळजच्या शेतकऱ्यांनी बाजू मांडली

Hearing of objections filed against Shaktipeeth Highway begins before Miraj Provincial Administrator | Sangli: शेतकरी म्हणाले, साहेब ‘शक्तिपीठ’ आम्हाला नकोच; दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी सुरु

Sangli: शेतकरी म्हणाले, साहेब ‘शक्तिपीठ’ आम्हाला नकोच; दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी सुरु

सांगली : शक्तिपीठ महामार्गाविरोधात दाखल केलेल्या हरकतींची सुनावणी सोमवार, दि. २१ पासून मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे सुरू झाली. पहिल्या दिवशी मिरज तालुक्यातील माधवनगर, पद्माळे, तासगाव तालुक्यातील वज्रचैंडे, सावळज गावांतील १२९ शेतकऱ्यांना सुनावणीला बोलावले होते. यापैकी जवळपास शंभरहून जास्त शेतकऱ्यांनी हजेरी लावून ‘साहेब, शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नकोच’, अशी भूमिका मांडली आहे. काही मोजक्याच शेतकऱ्यांनी भरपाईबद्दल विचारणा केली.

शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील प्रस्तावित द्रुतगती मार्ग असून, जो नागपूर आणि गोवा या शहरांना जोडतो. हा मार्ग ८०२ किलोमीटर लांब असून, सहा लेनचा आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर बागायत जमिनी जाणार असून, कृष्णा, वारणा नद्यांवर मोठा पूल होणार आहे. यामुळे कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येणार आहे तसेच अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नको आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी सुनावणीला मांडली.

लेखी भूमिकाही प्रांताधिकारी कार्यालयाकडे दिली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. दि. २१ ते ३० एप्रिलदरम्यान शक्तिपीठ महामार्गाबद्दल सुनावणी होणार आहे. पहिल्या दिवशी मिरज तालुक्यातील माधवनगर, पद्माळे, तासगाव तालुक्यातील वज्रचैंडे, सावळज येथील १२९ शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलावले होते.

यावेळी किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, प्रवीण पाटील, उमेश एडके, संग्राम पाटील यांच्यासह शेतकरी सुनावणीला उपस्थित होते.

सुनावणीला बोलावलेले शेतकरी
गाव - शेतकरी संख्या

  • माधवनगर - ०२
  • पद्माळे - ४५
  • सावळज - १९
  • वज्रचौंडे - ६३


आम्ही शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही : दिगंबर कांबळे

शक्तिपीठ महामार्ग नकोच, अशी भूमिका जवळपास शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी सोमवारी मांडली आहे. शक्तिपीठ महामार्ग का नको, याच्या कारणांसह लेखी पत्रही शासनाकडे सादर केले आहे. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागणार आहे. तसेच पर्यावरणाचेही माेठे नुकसान होणार आहे. म्हणून शक्तिपीठ महामार्ग नको, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, यासाठी १ मेपासून रस्त्यावरची लढाई चालू होणार आहे, असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला.

Web Title: Hearing of objections filed against Shaktipeeth Highway begins before Miraj Provincial Administrator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.