Sangli: म्हैसाळच्या नवीन धरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:43 IST2025-01-29T18:43:00+5:302025-01-29T18:43:34+5:30
पावसाळ्यात नदीकाठची शेती उद्ध्वस्त होणार का ? : शेतकऱ्यांचा सवाल

Sangli: म्हैसाळच्या नवीन धरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये भीती
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : म्हैसाळ येथे एक टीएमसी क्षमतेचे नवीन धरण बांधण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, हे धरण झाल्यावर नदीकाठी शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली जाणार का ? असा प्रश्न नदीकाठी जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना पडू लागला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कृष्णा नदीकाठी म्हैसाळ, कनवाड, ढवळी, कुटवाड या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीकाठी आहेत. पावसाळ्यात नदीकाठी असणाऱ्या सर्व शेतात पाणी जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतीचा नदीकडेचा भाग नदीपात्रात कोसळून जातो. महापूर आल्यास महिनाभर शेतातील पाणी जात नाही. या परिस्थितीतून जात असताना आता नव्याने बांधत असलेल्या नवीन बराजची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे हा नवीन बंधारा झाल्यास नदीपात्रात पाणी किती साठणार? पावसाळ्यात किती फूट पाणी वाढणार ? असे अनेक प्रश्न नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतावू लागले आहेत.
सध्या कृष्णानदीवर कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा करणे शक्य होत होते. या पाणीसाठ्यावर दोन ते तीन दिवस म्हैसाळ योजना सुरू राहत असते. आता नवीन बराज झाल्यास या धरणाची क्षमता एक टीएमसी इतकी होणार असून यामुळे म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. या धरणामुळे ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रास या योजनेचा लाभ होणार आहे. म्हैसाळ नवीन बराजमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसोबत संवाद हवा !
म्हैसाळ, कनवाड, ढवळी, कुटवाड या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या नदीकाठी आहेत. या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची गरज आहे.
आमच्या जमिनी नदीकाठी आहेत. नवीन बराज झाल्यास बॅक वॉटरमुळे शेती पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. याबाबत लवकरच शेतकऱ्यांना सोबत घेऊन अर्ज करणार आहे. - एम. डी. पाटील, शेतकरी, म्हैसाळ