Sangli: विजेच्या धक्क्याने इलेक्ट्रीशियनचा मृत्यू, मिरज एमआयडीसीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:18 IST2024-03-29T17:13:08+5:302024-03-29T17:18:07+5:30
नातेवाईकांची पोलिसात घातपाताची तक्रार

Sangli: विजेच्या धक्क्याने इलेक्ट्रीशियनचा मृत्यू, मिरज एमआयडीसीतील घटना
मिरज : मिरज औद्योगिक वसाहतीमधील एक्सेला पेन्सिल कारखान्यात विजेचे काम करीत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने संतोष बाजीराव नाडे (वय ४२,रा.कुपवाडवेस, मंगळवार पेठ, मिरज) हा इलेक्ट्रीशयन जागेवरच ठार झाला. नाडे यांचा कंपनीत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मयत संतोष नाडे हा मिरजेतील मिशन हाॅस्पिटलमध्ये ईलेक्ट्रीशयन म्हणून काम करीत होता. मिशन हाॅस्पिटल गेल्या काही वर्षापासून बंद असल्याने नाडे हा बाहेर मिळेल ते विजेचे काम करीत होता. गुरुवारी सकाळी मिरज एमआयडीसीतील एक्सेला पेन्सिल कंपनीतील वातानुकूलन यंत्र बंद पडले होते. त्याची दुरुस्तीचे काम करण्यासाठी नाडे कंपनीत गेला होता. दुपारी विजेचे काम करीत असताना अचानक विजेचा तीव्र झटका बसल्याने नाडे याचा जागेवरच मृत्यू झाला. कंपनीतील कामगारांनी त्याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही माहिती नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी दवाखान्यात एकच गर्दी केली होती.
संबंधित कंपनीच्या मालकावर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला होता. दरम्यान, विजेचा झटका बसल्याने नाडे याचा मृत्यू झाल्याची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.