मिरजेत बंडखोरांशी जवळीक दिगंबर जाधव यांना भोवली, भाजपने युवक जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 19:03 IST2024-10-24T19:02:09+5:302024-10-24T19:03:24+5:30
मिरज : मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजप बंडखोर मोहन वनखंडे यांना साथ देणाऱ्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ...

मिरजेत बंडखोरांशी जवळीक दिगंबर जाधव यांना भोवली, भाजपने युवक जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले
मिरज : मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजप बंडखोर मोहन वनखंडे यांना साथ देणाऱ्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी राज कबाडे यांची निवड करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप मिरजेत पिछाडीवर गेला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय मोहन वनखंडे यांनी बंडखोरी केल्याने यावेळी विधानसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक आहे. मिरजेत चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या सुरेश खाडे यांच्याविरोधात आघाडी उघडणारे मोहन वनखंडे यांना मिरजेत महाविकास आघाडी उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश खाडे यांना आव्हान देणाऱ्या वनखंडे यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेविका शांता जाधव यांचे पुत्र व युवा मोर्चाचे दिगंबर जाधव यांना पदावरून हटविण्यात आले आहे.
शहरातील काही माजी नगरसेवकांनी खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, वनखंडे समर्थक भाजपच्या माजी नगरसेविका शांता जाधव या भाजप बंडखोरासोबत असल्याने ही कारवाई अपेक्षित होती. महाआघाडीत प्रवेश करणारे वनखंडे यांनी काँग्रेसचा मेळावा घेऊन त्यांच्या भाजपमधील समर्थकांचा काँग्रेस प्रवेश होणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील वनखंडे समर्थकांना शोधून पदावरून हटविण्यात येत आहे.
भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी राज कबाडे व युवती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शोभाताई तोडकर यांची निवड करून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दोघांना निवडीचे पत्र दिले. पालकमंत्र्यांशी लढत देण्यासाठी वनखंडे महाविकास आघाडीत गेल्याने त्यांच्याशी जवळीक असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते पालकमंत्र्यांशी पुन्हा जुळवून घेण्याच्या मार्गावर आहेत.
मी अजून पक्षातच
काँग्रेसशी जवळीक साधणाऱ्या दिगंबर जाधव यांना पदावरून हटविले तरी मी अजून पक्षातच असल्याचे त्यांनी सांगितले. मी व युवा मोर्चाचे इतर पदाधिकारी वनखंडे यांच्या मेळाव्यात काँग्रेस प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.