Sangli Municipal Election 2026: कुपवाडला प्रभाग आठमध्ये एबी फॉर्मवरून गोंधळ, शिंदेसेनेत पडले दोन गट; तीन प्रभागात तिरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:55 IST2025-12-31T13:55:28+5:302025-12-31T13:55:55+5:30
एबी फॉर्म उशिरा दिल्याचा आरोप

Sangli Municipal Election 2026: कुपवाडला प्रभाग आठमध्ये एबी फॉर्मवरून गोंधळ, शिंदेसेनेत पडले दोन गट; तीन प्रभागात तिरंगी लढत
कुपवाड : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुपवाडच्या निवडणूक कार्यालयात प्रभाग क्रमांक आठमधील शिवसेना (शिंदे) गटाच्या उमेदवारांच्या ए.बी. फॉर्म वाटपावरून गोंधळ निर्माण झाला. यावेळी या विषयासाठी कार्यालयाबाहेर शिवसेनेचे दोन गट हजर झाले होते. यातील एक गट जाब विचारण्यासाठी आणि एक गट सुधारित दिलेल्या उमेदवारांच्या पत्राच्या बाजूने हजर झाला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर यातील उमेदवारी निर्णयाच्या प्रतीक्षेत उशिरापर्यंत थांबून राहिले होते.
कुपवाड प्रभाग समिती तीन निवडणूक कार्यालयाच्या प्रभाग एक, दोन आणि आठसाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत ते अर्ज स्वीकारण्याचा आज मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता. या प्रक्रियेसाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. कागदपत्रांची पडताळणी करणे आणि जमा करणे यासाठी धावपळ सुरू होती. उमेदवारांना आपली उमेदवारी सिद्ध करण्यासाठी पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येणार होते. त्यासाठी दुपारी तीन वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती.
यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या उमेदवारांना दोन वाजता एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक कार्यालयाकडून यादी निश्चित करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सायंकाळी एका पदाधिकाऱ्याकडून दुसरे सुधारित एबी फॉर्मचे पत्र सादर करण्यात आल्याचा आरोप शिंदेसेनेच्या काही उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी केला, तसेच इतरही काही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता, तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्हाला आत सोडा, अशी विनंती करू लागले. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही.
यादरम्यान सुधारित उमेदवारांच्या बाजूने दुसरा गट आल्यानंतर प्रथम आलेले काही पदाधिकारी वाद नको म्हणून निघून गेले. नंतर आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे सचिव संजय मोरे यांचे पत्र पत्रकारांना दाखवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाचे विष्णू माने, रूपेश मोकाशी, महेश सागरे, शिवसेनेचे प्रभाकर कुरळपकर, नितीन कुरळपकर, सचिन कांबळे, महेंद्र चंडाळे यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.
एक, दोन, आठमध्ये तिरंगी लढती रंगणार
कुपवाड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी कुपवाड प्रभाग एक, दोन आणि आठमधील दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. या तीनही प्रभागांत भाजप, शिंदेसेना, महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, पक्षांनी नाकारलेल्या अनेकांनी अपक्ष अर्ज भरून बंडखोरीचे शस्त्र उपसले आहे. अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली होती.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या पक्षीय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक एक - भाजप पॅनल : रवींद्र सदामते, माया गडदे, पद्मश्री पाटील, चेतन सूर्यवंशी. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी पॅनल : शेडजी मोहिते, रईसा रंगरेंज, विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी, प्रियंका विचारे. शिंदेसेना पॅनल -अनिल मोहिते, पायल गोसावी, रेश्मा तुपे, संदीप तुपे, अपक्ष- विश्वजित पाटील, प्रभाग क्रमांक दोन : भाजप पॅनल सौ. प्राजक्ता धोतरे, प्रकाश ढंग, मालुश्री खोत, प्रकाश पाटील.
काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार आघाडी पॅनल : सविता मोहिते, अय्याज नायकवडी, प्रेरणा कोळी, समीर मालगावे. राष्ट्रवादी (अजित पवार) : गजानन मगदूम. शिंदेसेना : अनिता वनखंडे, सिद्राम दळवाई, शमाबी मुजावर, विनायक यादव. उद्धवसेना : कासम मुल्ला, प्रभाग क्रमांक आठ : भाजप पॅनल दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, संजय पाटील. राष्ट्रवादी (अजित पवार) पॅनल : विष्णू माने, संजय कोलप, .पूनम मोकाशी, प्रियांका देशमुख. शिंदेसेना : महेश सागरे, जिजाताई लेंगरे, नेत्रा कुरळपकर, स्वप्निल औंधकर, युवराज शिंदे. समाजवादी पार्टी : नितीन मिरजकर.